Join us

मुख्यमंत्र्याच्या ताफ्यादरम्यान वाहतूक कोंडी; अधिकाऱ्याला १०० रुपयांचा दंड

By मनीषा म्हात्रे | Updated: August 26, 2022 16:53 IST

सहायक पोलीस फौजदारावर वाहतूकीचे नियमन व नियंत्रण कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून दंडाची शिक्षा देण्यात आली.

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला वर्षा या निवासस्थानावरुन विधान भवनाच्या दिशेने जाताना एअर इंडिया पासून पुढे साखर भवनपर्यंत झालेल्या वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले. याप्रकरणी एका सहायक पोलीस फौजदारावर वाहतूकीचे नियमन व नियंत्रण कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून १०० रुपयांच्या दंडाची शिक्षा देण्यात आली आहे.

वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी विधानभवन, मंत्रालय, मंत्र्यांची शासकीय निवासस्थाने या मार्गावर वाहतूकीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवला होता. यात वांद्रे-कुर्ला संकुल वाहतूक विभागाच्या एका सहायक पोलीस फौजदार यांची २२ ऑगस्ट रोजी मरीन ड्राईव्ह वाहतूक विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या गैंडा पॉईंट येथे नेमणुक करण्यात आली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाचा ताफा सकाळी सव्वा दहाच्या सुमारास वर्षा निवासस्थानावरुन विधान भवनाच्या दिशेने निघाला. दरम्यान एअर इंडिया पासून पुढे साखर भवनपर्यंत जात असताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी येथील वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या सहायक पोलीस फौजदाराला १०० रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे.   

टॅग्स :वाहतूक पोलीसएकनाथ शिंदेमुंबई