Join us

वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 07:06 IST

४०० ते ४५० रुपयांच्या भाड्याच्या अंतरासाठी प्रवाशांकडून ८०० ते ९०० रुपये वसुली

मुंबई: लोकल सेवा खोळंबली. प्रवाशांचे हाल होत असताना या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्यांनी दरांमध्ये भरमसाठ वाढ केली. दुसरीकडे या परिस्थितीतही इच्छितस्थळी येण्यास या सेवांचे चालक अनुत्सुक होते. त्यामुळे प्रवाशांची मोठी फरफट झाली. रेल्वे गाड्या उशिरा धावत आहेत. रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत  ॲप आधारित टॅक्सी सेवांनी प्रवाशांकडून  नेहमीपेक्षा जास्त भाडे आकारण्यास सुरुवात केली. ४०० ते ४५० रुपयांचे भाड्याच्या अंतरासाठी प्रवाशांकडून ८०० ते ९०० रुपये वसूल करण्यात येत होते. त्याबाबत तक्रार नागरिकांनी केल्या आहेत. ‘सर्ज प्रायसिंग’ या धोरणाखाली कंपनीकडून अशाप्रकारे भाडेवाढ केली जाते.

कुठे वाहतूक बंद आणि कुठे साचले पाणी?

  • दीड फूट पाणी साचल्याने एसआरव्ही हॉस्पिटल ते टिळकनगर कॉलनी (चेंबूर) येथे जाणारी वाहतूक संथ
  • पाणी साचल्याने अंधेरी कुर्ला घाटकोपर रोड मरोळ नाका मॅट्रो जंक्शन (सहार) येथे जाणारी वाहतूक मंदावली 
  • २ फूट पाण्याने सेंटॉर पूल (वाकोला) येथे जाणारी वाहतूक संथ
  • एससीएलआर (चेंबूर) येथे दक्षिणेकडे वाहतुकीवर परिणाम 
  • अर्धा फूट पाणी साचल्याने रिलायन्स मॉल शिंपोली रोड (बोरिवली) येथे जाणारी वाहतूक संथ
  • १ ते दीड फूट पाणी, पेडर रोड महालक्ष्मी मंदिर, ताडदेव संथ
  • वडाळा रेल्वे स्टेशन समोरील चौकात पाणी साचले. माटुंगाकडून वडाळा रेल्वे स्टेशनकडे येणारी वाहतूक ही फाइव्ह गार्डन, किंग्ज सर्कल ते दादर टी.टी. अशी वळवण्यात आली. वडाळा स्टेशनकडे येणारे सर्व रस्ते बंद
  • दादर टीटी, ट्रॉम्बे, महाराष्ट्र नगर सबवे, अँटॉप हील या ठिकाणी एमजी आर चौक, कानेकर नगर, सरदार नगर,  प्रतीक्षा नगर, त्याचप्रमाणे दादर टीटी या भागात सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे दीड ते दोन फुटापर्यंत पाणी साठले असल्याने  वाहतूक मंदावली
  • गोल देऊळ, गुलालवाडी, वडाळा, शिवडी, नबाब  टँक, नागपाडा, मराठा मंदिर, भायखळा, बावला कंपाऊंड, भोईवाडा, वडाळा  स्टेशन चार रस्ता, हिंदमाता जंक्शन, माटुंगा या भागात सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे दीड ते दोन फुटापर्यंत पाणी साठले असल्याने  वाहतूक संथ
  • अंधेरी सबवे पाणी भरल्यामुळे बंद. वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली. तसेच मुंबईत मालाड सब वे  मुंबई पायधुनी डीडी जंक्शन काळबादेवी   या भागात सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी तुंबले.
टॅग्स :मुंबईचा पाऊस