संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 07:01 IST2025-10-14T07:01:00+5:302025-10-14T07:01:26+5:30
एमएमआरडीए अभ्यास करणार, सल्लागार नेमणार

संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
मुंबई : सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत मुंबईत प्रचंड वाहतूककोंडी होते. १५ मिनिटांच्या प्रवासासाठी तास ते दीड तास खर्ची पडतात. परंतु, आता मुंबईकरांची ही डोकेदुखी थांबणार आहे. मुंबईत ७० किमीचे भुयारी मार्ग उभारण्याचा विचार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ने सुरू केला आहे.
दक्षिण मुंबईची थेट बुलेट ट्रेन स्थानक, आंतरराष्ट्रीय विमानतळ, बोरीवली यांना जोडणी देण्यासाठी, तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांच्यादरम्यानची वाहतूक जलद करण्यासाठी तब्बल ७० किमी लांबीचे भुयारी रस्त्यांचे जाळे उभारण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे. त्यातून हे भुयारी मार्ग प्रत्यक्षात आल्यास भविष्यात मुंबई शहरात १०० किमी लांबीहून अधिक लांबीचे रस्त्यांचे जाळे उभे राहील. त्याअनुषंगाने भुयारी मार्ग उभारण्याच्या दृष्टीने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी एमएमआरडीए सल्लागार नेमणार आहे.
वाहतूककोंडी फोडण्यासाठी आता थेट भुयारी मार्गाच्या जाळ्याने मुंबई जोडण्याचा विचार पुढे आला आहे. तीन टप्प्यांत या प्रकल्पाचे काम केले जाणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात कोस्टल रोडची थेट बीकेसी बुलेट ट्रेन स्थानकाला जोडणी दिली जाईल.
भुयारी मार्ग आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणार
वांद्रे-वरशी सी लिंक संपतो तिथून पुढे बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत भुयारी मार्ग उभारला जाईल. हा मार्ग पुढे आंतरराष्ट्रीय विमानतळाशी भुयारी मार्गाने जोडला जाईल.
भुयारी मार्गाची जोडणी पूर्व उपनगरात चेंबूर आणि एमटीएचएलजवळ दिली जाईल. दुसऱ्या टप्प्यात पश्चिम उपनगरातून पूर्व उपनगरात जाण्यासाठी भुयारी मार्ग उभारला जाईल.
भुयारी मार्गाची जोडणी विमानतळाशी दिली जाईल. तर तिसऱ्या टप्प्यात दक्षिण मुंबई थेट भुयारी मार्गानी बोरीवलीपर्यंत जोडली जाईल. त्यामुळे वाहतुककोंडीतून नागरिकांची सुटका होईल.
वांद्रे-वरळी सी-लिंक ते बीकेसी १६ किमीचा मार्ग
पहिला टप्पा - वांद्रे-वरळी सी-लिंक ते बीकेसी बुलेट ट्रेन स्थानक ते आंतरराष्ट्रीय विमानतळ - १६ किमी लांबी
दुसरा टप्पा - पश्चिम द्रुतगती महामार्ग ते पूर्व द्रुतगती महामार्गाची जोडणी. यात आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हा मार्ग जाईल - १० किमी
तिसरा टप्पा - थेट दक्षिण मुंबई ते बोरीवली भुयारी मार्ग उभारला जाईल. हा भुयारी मार्ग ठाणे बोरीवली टनेलला जोडला जाईल - - ४४ किमी
या भुयारी मार्गाची कामे सुरू - एमएमआरडीए
ठाणे ते बोरीवली भुयारी मार्ग - लांबी ११.८५ किमी - प्रकल्प खर्च १८,८३८ कोटी
ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भुयारी मार्ग -लांबी ९.२३ किमी - प्रकल्प खर्च ९,१५८ कोटी रुपये.
मुंबई महापालिका
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता भुयारी मार्ग -१२.२० किमी लांबी
या मार्गावर सातत्याने सकाळी आणि सायंकाळी प्रचंड वाहतुककोंडी होते. त्यामुळे नोकरदार मंडळींना कामावर लेटमार्क लागतो. तसेच घरी जातानाही तासन् तास अडकून राहावे लागते, अशी स्थिती आहे.