विश्वकर्मा योजनेतून घडताहेत पारंपारिक कारागीर, योजना नेमकी काय? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 11:32 IST2025-04-30T11:31:43+5:302025-04-30T11:32:57+5:30
या योजनेत प्रशिक्षणार्थींना दिवसाला ५०० रुपये विद्यावेतन, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसायासाठी आवश्यक अशा साहित्यासाठी १५ हजार रुपये किमतीचे टूल किट दिले जात आहे.

विश्वकर्मा योजनेतून घडताहेत पारंपारिक कारागीर, योजना नेमकी काय? जाणून घ्या...
मुंबई : राज्य सरकारतर्फे पारंपरिक हस्तकला व्यवसायातील कारागीरांसाठी विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून तरुणांना १८ व्यवसायांपैकी कोणत्याही एका व्यवसायाचे पाच दिवसांचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून मुंबई शहरात चार हजार ४२८, तर उपनगरांत दोन हजार ९३६ तरुण पारंपरिक व्यवसायाचे प्रशिक्षण घेत आहेत.
या योजनेत प्रशिक्षणार्थींना दिवसाला ५०० रुपये विद्यावेतन, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसायासाठी आवश्यक अशा साहित्यासाठी १५ हजार रुपये किमतीचे टूल किट दिले जात आहे.
व्यवसायासाठी कर्ज सुविधा
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यास प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे विश्वकर्मा म्हणून मान्यता दिली जाते. नोंदणीकृत कारागीरांना मिळणारे लाभ त्याला दिले जातात.
व्यवसाय उभारणीसाठी विनातारण पाच टक्के वार्षिक व्याजदराने एक ते तीन लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. उत्पादनांच्या विक्रीसाठी संधी उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेसाठी वेबसाइटवर नोंदणी करता येते.
आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड, बँक पासबुक, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो, मोबाइल नंबर कोणत्या कारागीरांसाठी योजना?
सुतार, सोनार, लोहार, चर्मकार, गवंडी, शिल्पकार (मूर्तीकार, दगडी कोरीव काम करणारा), धोबी, शिंपी, कुंभार, हार बनवणारा, नाभिक, विणकर, चटई/झाडू बनविणारे, दोरा वळणारे, होड्या बांधणारे, मासेमारीचे जाळे बनविणारे, कुलूप बनवणारे, पारंपरिक बाहुली व खेळणी बनवणारे.
लाभार्थी असे...
असंघटित क्षेत्रात स्वयंरोजगार तत्त्वावर हात व अवजारांनी काम करणारे कारागीर.
कुटुंब आधारित १८ पारंपरिक व्यवसायांपैकी एका व्यवसायातील कारागीर.
नोंदणीच्या तारखेस लाभार्थ्याचे किमान वय १८ वर्षे असावे.
कुटुंबातील एका व्यक्तीलाच या योजनेचा लाभ घेता येतो.
सरकारी कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला याचा लाभ घेता येत नाही.