लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: विघ्नहर्त्या बाप्पाला उद्या,शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तिभावाने निरोप देण्यात येणार आहे. हा सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. त्यानुसार बंदोबस्ताला 'एआय'ची जोड देण्यात आली आहे. यामुळे कुठे, किती वाहतूक आहे? काय हालचाली सुरू आहेत? या माहितीबरोबरच गर्दीच्या ठिकाणी पोलिस थेट ड्रोनद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविणार आहेत.
मुंबईत ६,५०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आणि दीड ते पावणेदोन लाख घरगुती गणपतीचे विसर्जन होणार आहे. यासाठी गिरगाव, जुहू, मढ मार्वेसह ६५ विसर्जन स्थळाबरोबर २०५ कृत्रिम तलाव आहेत. यासह मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आल्याचे सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले. वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
गर्दीच्या ठिकाणी साध्या गणवेशातील पोलिसांची फौज महत्त्वाच्या ठिकाणी काम करणार आहे. तसेच सायबर पोलिस सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असणार आहे. ३५० बीट मार्शल, ४०० पेट्रोलिंग व्हॅन आणि १०,००० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
एआय वापर नेमका कसा होणार?पोलिसांनी एआयच्या मदतीने सर्व घडामोडी टिपण्यासाठी लालबाग तसेच महत्त्वाच्या मंडळाच्या ट्रक, तसेच वाहनांना चीप बसवली आहे. गर्दीत हे वाहन जिथे जाईल तेथील स्थिती पोलिसांना आगाऊ कळेल. त्या मार्गावरील वाहतूक स्थितीचा अलर्ट मिळेल. त्यानुसार, तेथील परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास मदत होईल. तसेच, सीसीटीव्हीद्वारे संशयास्पद हालचाली, व्यक्तींबाबतही पोलिसांना अलर्ट मिळेल. यावेळी ड्रोनला पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम आणि लायटिंग जोडण्यात आली आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे प्रकाश टाकून पोलिस नागरिकांना थेट आवाहन करतील.
हे करा- कुठे काही मदत लागल्यास पोलिस हेल्पलाइन तसेच सोशल मीडियाद्वारे संपर्क करा.- कुठे काही संशयास्पद आढळल्यास थेट पोलिसांना माहिती द्या.
हे करू नका- कोणीही विनापरवानगी ड्रोनचा वापर करू नये.- विसर्जनानंतर मूर्तीच्या अवशेषांचे छायाचित्रे, चित्रफिती काढून प्रसारित करू नये.