पोलिसांसाठी ७५ भूखंडांवर ४५ हजार घरांची टाऊनशिप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 09:57 IST2025-10-11T09:57:32+5:302025-10-11T09:57:40+5:30
गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष असतील, तर पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सदस्य सचिव असतील.

पोलिसांसाठी ७५ भूखंडांवर ४५ हजार घरांची टाऊनशिप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पोलिस दलासाठी ४५ हजार निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती मुंबई शहरातील ७५ भूखंडांवर पोलिस हाउसिंग टाऊनशिप प्रकल्प उभारण्याप्रकरणी अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी गृहविभागाने जारी केले आहे.
गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष असतील, तर पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सदस्य सचिव असतील. समितीत मुंबई पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, तसेच सार्वजनिक बांधकाम, वित्त, नियोजन, गृहनिर्माण, नगरविकास विभागांचे अधिकारी, म्हाडा, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस गृहनिर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, तसेच मुंबई शहर व उपनगरांचे जिल्हाधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई पोलिस दलात सध्या ५१,३०८ अधिकारी व अंमलदार कार्यरत आहेत, मात्र केवळ १९,७६२ सेवानिवास उपलब्ध आहेत. परिणामी अर्ध्याहून अधिक कर्मचारी शहराबाहेरून ठाणे, बदलापूर, कल्याण, मीरारोड, विरार आदी उपनगरांतून रोजंदारीसाठी ये-जा करतात.
असा असेल प्रकल्प
४५,००० सेवा निवासांची योजना हाती घेतली आहे, ज्यामध्ये ४०,००० घरे अंमलदारांसाठी व ५,००० अधिकाऱ्यांसाठी असतील. हा प्रकल्प राबवण्यात आल्यास पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, तसेच त्यांच्या प्रवासाचा वेळ वाचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.