लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महिलेच्या गालाला, शरीराला जबरदस्तीने हात लावून तिचा विनयभंग करणाऱ्या एका ६५ वर्षीय व्यक्तीला गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि एक हजार रुपये दंड ठोठावला.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, आरोपी ताडदेव येथे राहतो. २० डिसेंबर २०२३ रोजी संबंधित महिला लिफ्टमधून आपल्या घरी नवव्या माळ्यावर जात असताना आरोपी लिफ्टमध्ये आला. त्याने महिलेला तुम्ही कुठे राहता, असे विचारले. त्यावर तिने नवव्या माळ्यावर, असे सांगितले. त्यानंतर आरोपीने जबरदस्तीने तिचा हात धरला आणि तिच्या गालाला हात लावला. त्यानंतर सहाव्या मजल्यावर तो उतरला. त्याच्याविरोधात महिलेने पोलिसांत तक्रार केली होती.
आरोपी आणि पीडिता एकाच इमारतीत राहतात. आरोपीने तिला लिफ्टमधून उतरताना ‘तू माझ्या घरी ये, नाही तर मी तुझ्या घरी येईन,’ अशी धमकी दिली. त्यामुळे महिला घाबरली, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. आरोपीने महिलेच्या गालाला हात लावल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला. त्याचे सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर करण्यात आले. मात्र, आरोपीच्या वकिलांनी आक्षेप घेतला. पेन ड्राइव्ह सादर करताना पोलिसांनी आयटी ॲक्टअंतर्गत प्रमाणपत्र सादर केलेले नाही, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला, ताे फेटाळला.
‘तांत्रिक बाबींपेक्षा जबाब महत्त्वाचा’पोलिसांनी आयटी कायद्याच्या कलम ६५ ब अंतर्गत प्रमाणपत्र सादर केले नसले तरी तक्रारदाराने तिच्या जबाबात आरोपीने तिच्या गालाला आणि शरीराला हात लावून विनयभंग केल्याचे सांगितले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्यापेक्षा तक्रारदाराच्या तोंडी पुराव्यास अधिक महत्त्व आहे. तांत्रिक बाबींपेक्षा तक्रारदाराच्या तोंडी पुराव्यास अधिक महत्त्व आहे. आरोपीने तक्रारदाराची लैंगिक छळवणूक केली आहे, असे निरीक्षण दंडाधिकारी श. उ. देशमुख यांनी नोंदवले.