ग्रामीण भागांप्रमाणे मुंबईतही हुंड्यासाठी विवाहितांचा मानसिक आणि शारीरिक छळ होत आहे. दिवसाला एक ते दोन महिला हुंड्यासह कौटुंबीक हिंसाचाराच्या शिकार ठरत आहेत. या छळाला कंटाळून पाच जणींनी टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपविले. यामध्ये सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हे नोंदवत कारवाई करण्यात आली आहे. तर, पाचही गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
गेल्या पाच महिन्यांत मुंबईत महिलांशी संबंधित २ हजार ९९५ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी २ हजार ६६९ गुन्ह्यांची उकल करण्यात आली. हुंड्यासाठी महिलांचा मानसिक, शारीरिक छळ सुरू असून पाच महिन्यात १९६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हुंड्याव्यतिरिक्त होत असलेल्या छाळाप्रकरणी १६८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हुंड्यासाठी एकीचा बळी घेण्यात आला आहे. तर दोन जणींनी आयुष्य संपविले. गेल्यावर्षी याच पाच महिन्यांत १९२ गुन्हे दाखल झाले होते. हुंड्याच्या छळाला कंटाळून पाच जणींनी आत्महत्या केली आहे. या घटनांप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे.
हुंडा नको, पण भेटवस्तू द्याअनेक जण हुंडा नको, पण भेटवस्तू म्हणून महागड्या गाड्या, दागिन्यांची मागणी करताना दिसतात. अनेक जण या मागण्या पूर्णही करत याला खतपाणी घालताना दिसतात.
महिला कक्षाचा आधार१. कुटुंबातील वाद पोलिसांपर्यंत आल्यानंतर महिला कक्षातील अधिकारी व कर्मचारी सुरुवातीला त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन पुढील कार्यवाही करतात. २. महिला कक्षाकडून अनेक प्रकरणांत समेट घडवून संसार टिकवण्याचे काम केले जाते आहे. ३. तर हुंडा तसेच विविध अत्याचाराला बळी पडत असलेल्या महिलांना या कक्षाचा आधार होताना दिसतो.
समाजातील प्रतिष्ठा अन्...अनेक जण बदनामीच्या भीतीने समाजातील मान, प्रतिष्ठा जपण्याच्या नादात मुलीला मानसिक शारीरिक छळ सुरू असतानाही सांभाळून घेण्यास सांगतात.
सासरच्या मागण्याही वेळोवेळी पूर्ण करतात. मात्र, यातून मुली टोकाचे पाऊल उचलत असल्याचेही काही प्रकरणात दिसून आले.