सव्वालाख मुंबईकरांना ‘टोरेस’चा गंडा; हजार कोटींची फसवणूक; संस्थापक युक्रेनला पळाला

By मनीषा म्हात्रे | Updated: January 8, 2025 06:10 IST2025-01-08T06:08:45+5:302025-01-08T06:10:17+5:30

फसवणुकीचे बिंग फुटताच पळण्याच्या तयारीत असलेल्या संचालकासह, जनरल मॅनेजर आणि स्टोअर मॅनेजरला शिवाजी पार्क पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

'Torres' scams 1.5 lakh Mumbaikars fraud of Rs 1000 crores founder flees to Ukraine but 3 people arrested | सव्वालाख मुंबईकरांना ‘टोरेस’चा गंडा; हजार कोटींची फसवणूक; संस्थापक युक्रेनला पळाला

सव्वालाख मुंबईकरांना ‘टोरेस’चा गंडा; हजार कोटींची फसवणूक; संस्थापक युक्रेनला पळाला

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: टोरेस ज्वेलरी ब्रँडच्या चांगल्या परताव्याच्या आमिषाला बळी पडलेल्या सव्वालाखाहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे हजार कोटींची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक तपासात समाेर येत आहे. फसवणुकीचा आकडा आठ ते दहा हजार कोटीपर्यंत जाऊ शकतो. तर फसवणुकीचे बिंग फुटताच पळण्याच्या तयारीत असलेल्या संचालकासह, जनरल मॅनेजर आणि स्टोअर मॅनेजरला शिवाजी पार्क पोलिसांनी मंगळवारी अटक केली. कंपनीचा संस्थापक मात्र युक्रेनला पसार झाल्याचा कयास आहे.  

शिवाजी पार्क पोलिसांनी उझबेकिस्तानची रहिवासी असलेली जनरल मॅनेजर तानिया कसातोवा, संचालक सर्वेश अशोक सुर्वे आणि रशियन नागरिक असलेली स्टोअर मॅनेजर व्हॅलेंटिना गणेश कुमार या तिघांना अटक केली आहे. तिघेही दादर कार्यालयातील रक्कम, दागिने घेऊन पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. कंपनीचा संस्थापक जॉर्न कार्टर आणि व्हिक्टोरीया कोवालेंको हे दोघेही युक्रेनला पसार झाल्याचे समजते. मुख्य कार्यकारी अधिकारी असलेला तौफिक रियाज आणि सीए अभिषेक गुप्ता दोघेही भारतात असून, त्यांच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. 

संचालक सुर्वे होता आधार कार्ड ऑपरेटर 

  • मुंबईचा रहिवासी असलेला सर्वेश अशोक सुर्वे हा आधार कार्ड ऑपरेटर म्हणून काम करीत असे. 
  • त्याला कंपनीचा संचालक बनवण्यासाठी त्याचे नाव, आधार कार्ड आणि डिजिटल सहीचा वापर करण्यात आला. 
  • त्याला दरमहा रोखीने २२ हजार रुपये पगार दिला जात होता, असे त्याच्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. 
  • त्याला डोंगरीतील उमरखाडी परिसरातून अटक करण्यात आली. 


म्हणून रोकड घेतली

नवीन वर्षात सर्व व्यवहार बंद करायचे आणि पोबारा करायचा, असा टोरेसचा हेतू होता. त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून २९ डिसेंबरपासून ऑनलाइन सेवा बंद करून रोखीने पैसे स्वीकारले. गुंतवणूकदारांना १० ते १२ टक्के परताव्याची लालूच दाखवल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात रोखीने गुंतवणूक केली. 

कार्यालयात लुटीचा बनाव, ७२ तासांत पैसे देण्याचे आश्वासन

  • कुणी घर, तर कुणी ठेवले दागिने गहाण; अनेकांचे भंगले स्वप्न
  • ...अन् भाजी विक्रेत्या कुटुंबाने गमावले साडे चार कोटी रुपये


या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे, तर दोघांविरुद्ध एलओसी जारी करण्यात आली आहे. तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. 
- गणेश गावडे, पोलीस उपायुक्त, (परिमंडळ ५)

सव्वालाख लोकांची फसवणूक

  • टोरेस हा ज्वेलरी ब्रँड प्लॅटिनम हर्न प्रा. लिमिटेड कंपनी चालवित होती. 
  • दादर, गिरगाव, कांदिवली, कल्याण, सानपाडा, मीरा रोड या सहा ठिकाणी टोरेसच्या शाखा आहेत. कांदिवलीची शाखा २९ डिसेंबरला सुरू करण्यात आली होती. 
  • सहाही शाखांमध्ये सुमारे सव्वालाख गुंतवणूकदारांनी हजारो कोटी रुपये गुंतविल्याचा अंदाज आहे. 
  • गुंतवणूकदारांनी गाठले पोलिस ठाणे
  • टोरेसच्या  प्रलोभनाला भुलून फसलेल्या गुंतवणूकदारांनी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गर्दी केली होती.
  • पोलिसांनी अनेकांचे तक्रार 
  • अर्ज आणि फसवणुकीची रक्कम नोंदवून घेतली. 
  • आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानेही मंगळवारी या फसवणूक प्रकरणाचा आढावा घेतला. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करणार आहे.  


अशी वाढत गेली टोरेसची साखळी... 

  • गुंतवणूक केल्यानंतर पहिल्यांदा एक लाखांचा मोजोनाईटचा हिरा खडा म्हणून सोपविला जायचा. तो नकली असल्याचेही सांगण्यात येत होते.
  • पुढे आठवड्याला ६ टक्के व्याजाप्रमाणे ६ हजार रुपये ५२ आठवडे देण्याचे प्रलोभन दाखवून गुंतवणूकदाराला दाखविले जात होते, जर कोणी गुंतवणूक केल्यास त्याला नवीन गुंतवणूकदार जोडल्यास त्यावर ५ ते १० टक्के कमिशन गुंतवलेल्या रकमेवर मिळत होती. 
  • पुढे ख्रिसमस, नवीन वर्षाच्या निमित्ताने कमिशनमध्ये थेट १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ करत रोखीने पैसे घेण्यास सुरुवात झाली. एकाच वेळी खात्यात येणारे हजारो रुपये पाहून साखळी वाढत गेली. 
  • खात्यामध्ये वाढणारे आकडे आणि आठवड्याला येणारी रक्कम पाहून यामध्ये गुंतवणुकीची रक्कमही वाढली. त्यानुसार, नवीन जोडणाऱ्या सदस्यांमागे रेफरल बोनस म्हणून मिळणाऱ्या रकमेमुळे २० ते १०० पेक्षा जास्त जणांची साखळी एका व्यक्तीमागे उभी राहत  गेल्याचे समोर आले आहे.

Web Title: 'Torres' scams 1.5 lakh Mumbaikars fraud of Rs 1000 crores founder flees to Ukraine but 3 people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.