टोरेस घोटाळा : कोट्यवधी रुपये हवालातर्फे परदेशात, हवाला ऑपरेटरची चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 07:29 IST2025-01-16T07:29:32+5:302025-01-16T07:29:46+5:30
आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईत एकूण ५ कोटी ९८ रोख रक्कम जप्त केली असून १५ कोटी ८१ लाख रुपये रक्कम कंपनी आणि आरोपींच्या बँक खात्यात सापडली आहे.

टोरेस घोटाळा : कोट्यवधी रुपये हवालातर्फे परदेशात, हवाला ऑपरेटरची चौकशी सुरू
मुंबई : टोरेस घोटाळ्यातील कोट्यवधी रुपये हवालामार्फत परदेशात पाठविल्याच्या संशयातून आर्थिक गुन्हे शाखेने हवाला ऑपरेटरची चौकशी सुरू केली आहे. तसेच या घोटाळ्यासंबंधात बुधवारी वरळीत आर्थिक गुन्हे शाखेने छापेमारी केली होती.
आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईत एकूण ५ कोटी ९८ रोख रक्कम जप्त केली असून १५ कोटी ८१ लाख रुपये रक्कम कंपनी आणि आरोपींच्या बँक खात्यात सापडली आहे. तसेच, पोलिसांनी २ कोटी ७० लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. याप्रकरणी एकूण २४ कोटी ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
टोरेस ब्रँड चालविणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रा. लि. कंपनीने गुंतवणुकीतून रक्कम गोळा करण्यासाठी बँक खात्यांसह गुन्ह्यातील रक्कम अन्य ठिकाणी वळविण्यासाठी वापरलेल्या खात्यांचा तपशील आर्थिक गुन्हे शाखेने मागविला होता. पोलिसांनी किती रक्कम, कुठे आणि कशी वळविली याची पडताळणी सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
५७ कोटींची फसवणूक
गुंतवणूकदारांनी एकूण ५७ कोटी ५६ लाखांना फसवणूक झाल्याच्या तक्रारी बुधवारपर्यंत मिळाल्या आहेत. फसवणुकीचे कोट्यवधी रुपये हवालामार्फत परदेशात वळते झाल्याच्या संशयातून हवाला ऑपरेटर गुन्हे शाखेच्या रडारवर आला आहे.