टोरेस घोटाळ्यामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान, ईओडब्ल्यूची न्यायालयाला माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 06:47 IST2025-01-14T06:47:34+5:302025-01-14T06:47:47+5:30
'टोरेस' ज्वेलरी ब्रँडच्या मालकीच्या खासगी कंपनीद्वारे चालविलेल्या पॉन्झी स्किमप्रकरणी ११ आरोपी फरार आहेत. त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

टोरेस घोटाळ्यामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान, ईओडब्ल्यूची न्यायालयाला माहिती
मुंबई : टोरेस गुंतवणूक घोटाळा ३८ कोटी रुपयांवर पोहोचला असून, हे प्रकरण आता गंभीर झाले आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले आहे, असा दावा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने (ईओडब्ल्यू) विशेष न्यायालयात केला आहे. न्यायालयाने या प्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींच्या पोलिस कोठडीत १८ जानेवारीपर्यंत वाढ केली. 'टोरेस' ज्वेलरी ब्रँडच्या मालकीच्या खासगी कंपनीद्वारे चालविलेल्या पॉन्झी स्किमप्रकरणी ११ आरोपी फरार आहेत. त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यात परदेशी नागरिकांचाही समावेश आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.
उझबेकिस्तानचा नागरिक असलेला ताझगुल झासाटोव्हा, रशियन नागरिक व्हॉलेंटिना गणेश कुमार आणि सर्वेश सुर्वे या फर्मच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एमपीआयडी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी तिघांना ७ जानेवारीला अटक केली. या तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती करताना सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, आतापर्यंत केलेल्या तपासातून ३८ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, १,९१६ गुंतवणुकदारांनी फसवल्याची तक्रार केली आहे. आरोपींकडून आतापर्यंत १७ कोटी रुपये वसूल केले आहेत. 'हा गुन्हा गंभीर आहे. आरोपींनी गुन्ह्याद्वारे कमावलेले पैसे बेकायदेशीर मार्गाने परदेशातील खात्यांमध्ये हस्तांतरित केले आहेत', अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.
लुकआऊट नोटीस जारी
आतापर्यंत ११ आरोपी फरार असून, त्यात परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. या घोटाळ्यामागील खरा सूत्रधार कोण आहे? हे शोधायचे आहे. अटक केलेले आरोपी तपासाला सहकार्य करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कोठडीची आवश्यकता आहे. कंपनीची बँक खाती आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी त्यांच्या कोठडीची आवश्यकता आहे, असे पलिसांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत तिन्ही आरोपींना १८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.