तक्रार केली, जबाबही घेतला, कारवाई शून्य; आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाचे पत्र समोर
By मनीषा म्हात्रे | Updated: January 14, 2025 06:54 IST2025-01-14T06:54:04+5:302025-01-14T06:54:29+5:30
पोलिसांनीही पोलिस ठाण्याबाहेर ताटकळत ठेवल्याचा आरोप टोरेस घोटाळ्याबाबत तक्रार करणाऱ्या शशिकांत कावळे यांनी केला आहे.

तक्रार केली, जबाबही घेतला, कारवाई शून्य; आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाचे पत्र समोर
- मनीषा म्हात्रे
मुंबई : टोरेस प्रकरणात समोर येत असलेल्या पत्रांमुळे पोलिसांवरचा संशय वाढत आहे. एका प्रकरणात नोव्हेंबरमध्ये आलेल्या तक्रारीची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेने तक्रारदाराचा जबाबही नोंदवला. मात्र कारवाई केली नसल्याचे समोर आले. तर शिवाजी पार्क पोलिसांनीही पोलिस ठाण्याबाहेर ताटकळत ठेवल्याचा आरोप टोरेस घोटाळ्याबाबत तक्रार करणाऱ्या शशिकांत कावळे यांनी केला आहे. पोलिसांना कारवाई करायचीच नव्हती म्हणून फक्त दिवस ढकलत होते, असेही त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी मानवी हक्क आयोगाकडेही धाव घेतली आहे.
धारावीत राहणारे शशिकांत कावळे यांनी गेल्यावर्षी १६ नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांसह नवी मुंबई, ठाणे, मिरारोडसह विविध यंत्रणांना पोलिस ठाण्यांना पत्रव्यवहार केले. टोरेसचे कार्यालय असलेल्या हद्दीतील सहाही पोलिस ठाण्यात त्यांनी अर्ज करत कारवाईची मागणी केली. यापैकी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना १२ डिसेंबर रोजी कागदपत्रे घेऊन जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांनी कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावली. त्यांच्याकडील पुरावे सादर करत त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर पुन्हा आठवडाभराने त्यांना अधिक माहितीसाठी बोलावण्यात आले.
कावळे यांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक गुन्हे शाखेने दखल घेत फक्त जबाब नोंदवला. पण कारवाई केली नाही. शिवाजी पार्क पोलिसांनीही बोलावून घेतले. मात्र दोन तास पोलिस ठाण्याबाहेर ताटकळत ठेवले. मुळात कुणाला कारवाई करायची नव्हती. हे खूप मोठे रॅकेट आहे. यामध्ये यंत्रणाही दोषी आहे. पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह एसीपी, डीसीपीपासून पोलिस आयुक्तांपर्यंत पत्रव्यवहार केला होता. कोणीच लक्ष दिले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अंतर्गत चौकशी सुरू
शिवाची पार्क पोलिसासह नवी मुंबई पोलिसांनी गेल्यावर्षी जून, ऑक्टोबर महिन्यात चौकशीसाठी हजर राहण्यासंबंधित टोरेसच्या संस्थापक, संचालकांना केलेल्या पत्रव्यवहाराचे पत्र समोर आले. तसेच टोरेस कर्मचाऱ्यांनी केलेल्या मेलही बाहेर आले होते. या प्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू आहे.