मशाल, झाडू, तुतारी, सायकल... हाताच्या साथीला; 'भारत जोडो न्याय यात्रे'ला मुंबईकरांचा प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 10:03 AM2024-03-18T10:03:43+5:302024-03-18T10:04:08+5:30

एकाचवेळी भगव्यासोबत तिरंग्या, निळ्या, पिवळ्या रंगाचे झेंडे फडकलेले या ऐतिहासिक मैदानात प्रथमच पाहायला मिळाले.

Torch, broom, trumpet, bicycle... hand in hand; Response of Mumbaikars to 'Bharat Jodo Nyaya Yatra' | मशाल, झाडू, तुतारी, सायकल... हाताच्या साथीला; 'भारत जोडो न्याय यात्रे'ला मुंबईकरांचा प्रतिसाद

मशाल, झाडू, तुतारी, सायकल... हाताच्या साथीला; 'भारत जोडो न्याय यात्रे'ला मुंबईकरांचा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उमेदवार कुठल्याही पक्षाचा असो, आम्ही त्याला पाठिंबा देणार... मशालीने विरोधकांना जाळून टाकू... आम्हाला इथे कोणी आणले नाही, आम्ही स्वत:हून आलो आहोत... अशा प्रतिक्रिया होत्या शिवाजी पार्कमधील सभेला जमलेल्या काही जणांच्या. रविवारी येथे इंडिया आघाडीची सभा झाली. त्यास मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र होते.

काँग्रेसच्या हाताला ठाकरे गटाची मशाल, आम आदमी पक्षाचा झाडू, समाजवादी पक्षाची सायकल आणि शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीची तुतारी या सगळ्यांची साथ लाभल्याचे शिवाजी पार्कवरील सभेत दिसून आले. सभेला काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्या खालोखाल शिवसैनिकांनी सभेला गर्दी केली होती. उल्लेखनीय म्हणजे यात महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. विक्रोळीतून नीलम महामुणकर ७०-८० महिलांसोबत आल्या होत्या. त्यात घरकाम करणाऱ्या महिला मोठ्या संख्येने होत्या. महत्त्वाचे म्हणजे सगळ्या महिला लोकलचा प्रवास करून आल्या होत्या.

शिवसेनेच्या शाखाशाखांतून शिवसैनिक सभेला आले होते. गरज वाटल्यास काँग्रेसला साथ देणार का, असे विचारता दादरचे शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे यांनी ‘साथ देणार म्हणजे मशालीने विरोधकांना जाळून टाकू’, अशी जळजळीत प्रतिक्रिया दिली. सांताक्रूझहून ४०-५० महिलांसोबत आलेल्या अनिता कदम यांनी आम्ही आपणहून सभेला आलो असल्याचे सांगितले आणि पक्षाला गरज लागेल तेव्हा तेव्हा बाहेर पडू, अशी ग्वाही दिली. उमेदवार कुठल्याही पक्षाचा असो, आम्ही पाठिंबा देणार, अशी प्रतिक्रिया उत्तर मुंबईचे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद शिर्के यांनी दिली. शिवसेनेच्या नेहरूनगर येथील माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर आपले ५० कार्यकर्ते घेऊन आल्या होत्या. मुंबईत मराठी माणूस टिकायला हवा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यावेळी काँग्रेस आणि शिवसेनेचे (उबाठा) कार्यकर्ते समन्वय साधून काम करत असल्याचे दिसून आले.

एकाचवेळी भगव्यासोबत तिरंग्या, निळ्या, पिवळ्या रंगाचे झेंडे फडकलेले या ऐतिहासिक मैदानात प्रथमच पाहायला मिळाले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव इत्यादी नेते काय बोलणार, याबाबत लोकांमध्ये उत्सुकता होती. मैदान सातच्या सुमारास गर्दीने भरून गेले होते. परंतु कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे भाषण लांबल्याने सायंकाळी चार-पाच वाजल्यापासून मैदानावर ताटकळत बसून असलेले कार्यकर्ते कंटाळले. उशीर झाल्याने आठच्या सुमारास अनेकांनी घरचा रस्ता धरला.

Web Title: Torch, broom, trumpet, bicycle... hand in hand; Response of Mumbaikars to 'Bharat Jodo Nyaya Yatra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.