अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस; यंत्रणेची कसोटी; निवडणूक कार्यालयांमध्ये गर्दी उसळण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:39 IST2025-12-29T16:39:08+5:302025-12-29T16:39:51+5:30
पालिकेकडून १० हजारांहून अधिक उमेदवारी अर्जांचे वितरण झाल्यामुळे त्याचे प्रमाणात ते भरले जाण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता संपूर्ण निवडणूक यंत्रणेची कसोटी लागणार आहे.

अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस; यंत्रणेची कसोटी; निवडणूक कार्यालयांमध्ये गर्दी उसळण्याची शक्यता
मुंबई : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे २ दिवस उरले असून, अद्याप राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत अर्ज स्वीकारण्यापासून ते योग्य कागदपत्रांसह अर्ज दाखल करून घेण्यापर्यंत पालिका कर्मचाऱ्यांचा कस लागणार आहे.
पालिकेकडून १० हजारांहून अधिक उमेदवारी अर्जांचे वितरण झाल्यामुळे त्याचे प्रमाणात ते भरले जाण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता संपूर्ण निवडणूक यंत्रणेची कसोटी लागणार आहे.
पालिका निवडणुकांसाठी उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची सुरुवात २३ डिसेंबरपासून झाली. मात्र, आतापर्यंत जवळपास ३७ अर्ज दाखल झाले असून, ३० डिसेंबरला अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे. मुंबईतील २२७ प्रभागांसाठी मोठ्या राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारदेखील अर्ज भरणार असल्याने पुढच्या २ दिवसांत निवडणूक अधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी रांगा लागतील. निवडणूक यंत्रणेवर ताण येणार असल्याने २३ निवडणूक अधिकारी कार्यालयात
यंत्रणा सज्ज ठेवल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आतापर्यंत १० हजारांहून अधिक अर्जांचे वितरण
२३ डिसेंबरपासून चार दिवसांत मिळून १० हजार ३४३ नामनिर्देशनपत्रांचे वितरण झाले असून, एकूण ४४ नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली आहेत. पहिल्या दिवशी ४ हजार १६५ नामनिर्देशन अर्ज वितरित झाले. मात्र, एकही अर्ज दाखल झाला नाही.
२४ डिसेंबर रोजी २ हजार ८४४ नामनिर्देशन अर्जांचे, तर २६ डिसेंबर रोजी २ हजार ०४० नामनिर्देशन अर्जांचे वितरण झाले व ९ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. २७ डिसेंबर रोजी १ हजार २९४ नामनिर्देशन अर्जांचे वितरण आणि ३५ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले.