टोल वाढ; मुंबईच्या नाक्यांवर गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 03:03 PM2020-10-01T15:03:37+5:302020-10-01T15:04:09+5:30

Mumbai toll plaza : मुंबईत प्रवेश करताना वाढीव दराने टोल द्यावा लागल्याने नाराजीचा सूर उमटला.

Toll increase; Confusion on the noses of Mumbai | टोल वाढ; मुंबईच्या नाक्यांवर गोंधळ

टोल वाढ; मुंबईच्या नाक्यांवर गोंधळ

Next

मुंबई : रस्त्यांवर पडलेले खडडे, नादुरुस्त रस्ते, वाहतूक कोंडी आणि कोरोनाचा विळखा अशा अनेक समस्यांनी घेरलेल्या नागरिकांच्या मनस्तापात गुरुवारी झालेल्या टोल वाढीने भर घातली. भल्या पहाटेपासूनच नागरिकांना मुंबईत प्रवेश करताना वाढीव दराने टोल द्यावा लागल्याने नाराजीचा सूर उमटला. विशेषत: आजपासून झालेल्या टोल वाढीची कल्पना नसल्याने नागरिकांनी पावती फाडताना आपल्या नाराज भावना व्यक्त केल्या.

१ ऑक्टोबरपासून मुंबईच्या टोल नाक्यावरील दरात पाच ते पंचवीस रुपयांची वाढ झाली. मुंबईत प्रवेश करताना मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लाल बहादूर शास्त्री मार्गावर टोल नाक्यांवर सकाळीच नागरिकांना वाढीव दराची पावती फाडावी लागली. सर्वच प्रमुख टोल नाक्यांवर नेहमीप्रमाणे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. आणि साहजिकच या रांगेतून वाढीव टोल भरताना नागरिकांनी रस्त्यावरील खडडे, नादुरुस्त रस्ते, वाहतूक कोंडी, इंधन दरवाढ अशा सर्वच घटकांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली.

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर टिकेची झोड उठविली. सकाळी सकाळीच नागरिकांच्या खिशाला कात्री बसल्याने सर्वच स्तरातून नाराजीचा सूर उमटत होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकल बंद असल्याने रस्ते मार्गाने प्रवास करावा लागत आहे. खड्डे आणि वाहतूक कोंडी डोकेदुखी असताना टोलदर वाढवले जात आहेत; आणि हे अन्यायकारक आहे, अशी भावना वाहन व्यक्त करण्यात आली. त्यात टोलचे दर वाढवले तर रस्ते खड्डेमुक्त होणार का? असा सवाल देखील करण्यात आला.

एमईपी कंपनीचे हे सर्व टोलनाके आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा विचार करता येथील ५५ उडडाणपूलांच्या उभारणीचा खर्च २००२ ते २०२७ या २५ वर्षांच्या काळातील वसुलीसाठी येथील नाक्यांवर टोल आकारला जातो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यासोबत जो करार झाला आहे त्या कराराचा विचार करता येथील टोलचा दरात दर तीन वर्षांनी वाढ केली जाते. त्यानुसार, १ ऑक्टोबर रोजी पुन्हा टोल दरात वाढ केली गेली.

------------------

असे आहेत नवे टोल
अवजड वाहने : १६० रुपये
मध्यम अवजड वाहने : ६५ रुपये
ट्रक आणि बस : १३० रुपये
छोटी वाहने : ४० रुपये
पाच नाक्यांसाठीच्या मासिक पासकरिता १५०० रुपये द्यावी लागतील.
 

Web Title: Toll increase; Confusion on the noses of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.