Join us

बेस्ट संपाबाबत आज निर्णय; मतमोजणीला सकाळी होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 06:05 IST

नवीन वेतन करार व अन्य मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमाने जानेवारी महिन्यात नऊ दिवसांचा संप केला होता. न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर लवादाची स्थापना करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्नही झाला, परंतु वेतनश्रेणीबाबतचा प्रस्ताव अद्याही चर्चेतच अडकला आहे.

मुंबई : सुधारित वेतनश्रेणीबाबत यशस्वी तोडगा निघत नसल्याने, बेस्ट कामगारांच्या कृती समितीने संपाची तयारी सुरू केली आहे. मात्र, यावेळीही कामगारांचा कौल घेऊनच संपाबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी बस आगारांमध्ये शुक्रवारी मतदान घेण्यात आले. उद्या मतमोजणीनंतरच कामगारांचा कल कळू शकणार आहे, परंतु मतमोजणी रोखण्याचा प्रयत्न झाल्यामुळे काही बस आगारांमध्ये तणाव पसरला होता.

नवीन वेतन करार व अन्य मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमाने जानेवारी महिन्यात नऊ दिवसांचा संप केला होता. न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर लवादाची स्थापना करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्नही झाला, परंतु वेतनश्रेणीबाबतचा प्रस्ताव अद्याही चर्चेतच अडकला आहे. गेले काही दिवस बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीमध्ये चर्चाही सुरू होत्या. त्यामुळे २० आॅगस्ट रोजी नियोजित संप पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, चर्चेतून काहीच निष्पन्न होत नसल्याने कृती समितीने शुक्रवारी बस आगारांमध्ये मतदान घेतले.

परंतु शिवसेनेसह अन्य काही संघटनांचाही या संपाला विरोध आहे. त्यामुळे वडाळा, गोरेगाव, गोराईत मतपत्रिका फाडण्याचा प्रयत्न झाला. वडाळा आगार येथे मतपेटीच रस्त्यावर फेकली गेली, असा व्हिडीओ वायरल झाला. अशा तणावाच्या परिस्थितीत मतदान पार पडले असून, शनिवारी सकाळी मतमोजणी केली जाणार आहे. त्यानंतरच किती टक्के कामगार संपाच्या बाजूने आहेत? हे स्पष्ट होईल, असे कामगार नेते शशांक राव यांनी सांगितले.दुपारनंतर चित्र स्पष्टपरळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये सकाळी ९ वाजता मतमोजणी होणार आहे. त्यानंतर, बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीची दुपारी दोन वाजता बैठक होऊन संपाबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.संप होऊ देणार नाहीसर्व कामगार संघटनांबरोबर प्रशासनाची चर्चा सुरू असताना संपाची हाक देणे कितपत योग्य? शुक्रवारी झालेल्या मतदानाला बेस्ट कामगार सेनेसह भाजपप्रणित व अन्य बेस्ट कामगार संघटनांनीही विरोध दर्शविला आहे. त्यामुळे कामगार मतदानाला गेलेले नाहीत. आम्ही संप होऊ देणार नाही, संप झालाच, तर आमचे कामगार संपात सामील होणार नाही, असे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी स्पष्ट केले.बस आगारांमध्ये गोंधळजानेवारी महिन्यात कामगारांच्या संपामध्ये शिवसेना सामील होती, परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांनी माघार घेतली होती. यावेळेस संप होऊ नये, यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मतदानालाही तीन आगारांमध्ये बेस्ट कामगार सेनेने विरोध केला. शिवसेनेचे कार्यकर्ते पाठवून मतपत्रिका फाडण्यात आल्या. वडाळा येथील विरोधाबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

टॅग्स :बेस्ट