Join us  

राज्यात दिवसभरात 5229 कोरोनाबाधितांची नोंद; दररोजच्या मृतांच्या आकड्याने चिंता कायम

By मुकेश चव्हाण | Published: December 04, 2020 8:53 PM

सध्या राज्यात 5 लाख 47 हजार 504 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर 5 हजार 567 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

मुंबई: राज्यात गेल्या 24 तासांत नव्या 5,229 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आज 127 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 83,859 वर पोहचली आहे. तसेच आज 6,776 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. 

राज्यात आतापर्यत 47 हजार 599 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट दिसून येत आहे. मात्र दररोज सरासरी शंभरच्या वर कोरोनाबाधित रुग्ण दगावत असल्याने चिंता मात्र कायम आहे. राज्यात एकूण 83859 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.81% झाले आहे. सध्या राज्यात 5 लाख 47 हजार 504 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर 5 हजार 567 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या महिनाभरापासून या साथीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याचे दिसून येत आहे. राज्यात आज 5229 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6776 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1710050 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. 

दरम्यान, दिवाळीनंतर राज्यासह मुंबईत कोरोनाचा धोका वाढेल, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली होती. मात्र समाधानकारक बाब म्हणजे, तज्ज्ञांनी वर्तविलेल्या निरीक्षणानुसार राज्यासह मुंबईची रुग्णसंख्या व मृत्यूच्या प्रमाणात तितकीशी वाढ झाली नसल्याचे समोर आले. आता टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी डिसेंबरअखेर कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.

राज्याच्या टास्क फोर्समधील डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, असे म्हणता येणार नाही. परंतु, राज्यातील तापमानात घट झाल्यास शिवाय प्रदूषणात वाढ झाल्यास कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. यापूर्वी मे, जून आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता वाढली होती.

विमानाने सात दिवसांत २१ कोरोनाबाधित प्रवासी आले पुण्यात-

कोरोनाला अटकाव करण्यासाठी दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यांतील विमान प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. या चाचणीमध्ये पुण्यात आलेले २१ प्रवासी बाधित आढळून आले आहेत. चाचणी अहवाल नसलेल्या ५०७ प्रवाशांची विमानतळावर चाचणी करण्यात आली होती.

राज्य शासनाकडून दुसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून कोरोनाला अटकाव करण्यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. दि. २५ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. विमान प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. तर रेल्वे प्रवाशांना लक्षणे दिसल्यास स्थानकावरच अँटीजेन चाचणी केली जात आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रमुंबईपुणे