Join us  

स्ट्रॉबेरीपासून वाईन निर्मित्तीचा प्रकल्प उभारणार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 10:00 AM

पाचगणी येथील बिलीमोरिया शाळेच्या सभागृहात स्ट्रॉबेरी विथ सीएम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

मुंबई - महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी उत्पन्न घेतले जाते. यावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असून याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच, स्ट्रॉबेरी पासून वाईन निर्मितीचा प्रकल्पही महाबळेश्वर येथे उभारण्यात येईल, अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

पाचगणी येथील बिलीमोरिया शाळेच्या सभागृहात स्ट्रॉबेरी विथ सीएम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. शेत पिकावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांना त्याचा अधिक फायदा होईल. यादृष्टीने शेतीमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतीमधून आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन, एक रुपयात पीक विमा अशा अनेक योजना राज्य शासन राबवीत आहेत. त्याचबरोबर अतिवृष्टीत बाधित शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने आर्थिक मदत करण्याचा निर्णयही शासनाने घेतल्याचे त्यांनी सांगितले.

महाबळेश्वर व जावळी हे डोंगरी तालुके आहेत. येथील नागरिक कामासाठी मुंबई येथे जातात . ते पुन्हा गावात यावेत, नोकरीच्या शोधार्थ शहरात जाणाऱ्यांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी पर्यटन वाढी बरोबर रोजगार निर्मितीवर भर देत आहोत. येथील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे. बांबू नगदी पीक असून बांबूपासून फर्निचर, इथेनॉल निर्मिती करता येते. बांबू लागवडीसाठी शासन अनुदान देत असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच स्ट्रॉबेरी पासून वाईन निर्मितीचा प्रकल्पही महाबळेश्वर येथे उभारण्यात येईल, अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

पॅराग्लायडिंगचा वर्ल्डकप खेळवू 

दरम्यान, पॅराग्लायडिंग हा एक साहसी खेळ असून तो खेळणे साहसी लोकांचे काम आहे. वर गेलेल्या माणसाच्या क्षमतेची कसोटी लागते. या खेळात सहभागी होण्यासाठी आलेल्या १२ देशांतील खेळाडूंचे स्वागत केले. तसेच लवकरच या खेळाचा वर्ल्ड कप देखील महाराष्ट्रात खेळावला जावा यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाहीही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी दिली. 

टॅग्स :मुंबईमहाबळेश्वर गिरीस्थानएकनाथ शिंदेमुख्यमंत्री