रस्ता सुरक्षा अन् अपघात रोखण्यासाठी ऑनलाइन लर्निंग लायसन्स चाचणी तात्पुरती बंद करणार; परिवहनमंत्र्यांचे एनआयसीला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 09:57 IST2025-09-20T09:57:07+5:302025-09-20T09:57:39+5:30

फील्ड अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रत्यक्ष तपासणीत फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणालीमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळल्या आहेत.

To prevent road safety and accidents, online learning license test will be temporarily suspended; Transport Minister's letter to NIC | रस्ता सुरक्षा अन् अपघात रोखण्यासाठी ऑनलाइन लर्निंग लायसन्स चाचणी तात्पुरती बंद करणार; परिवहनमंत्र्यांचे एनआयसीला पत्र

रस्ता सुरक्षा अन् अपघात रोखण्यासाठी ऑनलाइन लर्निंग लायसन्स चाचणी तात्पुरती बंद करणार; परिवहनमंत्र्यांचे एनआयसीला पत्र

मुंबई : वाहन चालवण्यासाठी आवश्यक असलेली ऑनलाईन लर्निंग लायसन्स चाचणी तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. फील्ड अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रत्यक्ष तपासणीत फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणालीमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. एनआयसी अर्थात नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरच्या सुरक्षा सॉफ्टवेअरला बगल देऊन उमेदवाराशिवाय लर्निंग लायसन्स चाचणी देणे आणि उत्तीर्ण होणे शक्य असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. हे लक्षात घेऊन या प्रणालीत सुधारणा होईपर्यंत ऑनलाइन लर्निंग लायसन्स चाचणी तात्पुरती बंद करण्यासाठी परिवहन विभागाला पत्र लिहिल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

अनेक गंभीर त्रुटींमुळे बैठक

ऑनलाईन लर्निंग लायसन्समध्ये जन्मतारीख, पत्ता, उमेदवाराचे नाव इत्यादी माहितीमध्ये फेरफार करता येतो. तसेच प्रत्यक्ष चाचणी न देता किंवा उमेदवार उपस्थित नसतानाही लर्निंग लायसन्स मिळविण्यासाठी चाचणी देणे आणि ती उत्तीर्ण होणे शक्य आहे. अशा अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या. या पार्श्वभूमीवर याप्रकरणी आज परिवहनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. 

पक्क्या लायसन्ससारखा होतोय वाप

वयाची १८ वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर मोठ्या संख्येने तरुण ऑनलाईन लर्निंग लायसन्स काढतात.  याचा वापर त्यांच्याकडून पक्क्या लायसन्सप्रमाणे केला जात असून त्यांच्याकडून बेदरकारपणे वाहन चालवले जात असल्याने गंभीर अपघात घडतात. 

थर्ड पार्टीमार्फत लर्निंग लायसन्स?

इतर काही राज्यांनी थर्ड पार्टीमार्फत फेसलेस लर्निंग लायसन्स चाचण्या घेण्याची पद्धत अवलंबली आहे. महाराष्ट्रात अशी पद्धत राबवता येईल का? याचीच चाचपणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

केरळ, तेलंगणा, झारखंड, उत्तराखंड, त्रिपुरा, मेघालय, नागालँड, लडाख, लक्षद्वीप अशा राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांमध्ये आरटीओ कार्यालयामार्फतच परीक्षा द्यावी लागते.

ही पद्धत किती व्यवहार्य आणि सुरक्षित आहे, याचीही चाचपणी करण्यात येणार असून त्यासाठी राज्य शासनाने तज्ज्ञ समितीमार्फत या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागविला आहे. समितीच्या शिफारशींवर आधारित सुधारणा लवकरात लवकर करण्यात याव्यात, असे निर्देशही सरनाईक यांनी दिले आहेत.

Web Title: To prevent road safety and accidents, online learning license test will be temporarily suspended; Transport Minister's letter to NIC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.