Join us  

"खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं"; रोहिणी खडसेंचा पुन्हा एकदा चित्रा वाघ यांच्यावर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 8:23 AM

"ओ ऽऽऽऽ मोठ्ठया ताई… (सुप्रिया सुळे), कुठल्याही चांगल्या योजनेला विरोध करणं हे तुमचे कर्तव्यचं आहे ना जणू …? , असे म्हणत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली होती

मुंबई - महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी ''लेक लाडकी योजना'' हाती घेत गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय जारी केला. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात हा निर्णय घेण्यात आला. या योजनेवरून बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या टीकेला भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिले. मात्र, या टीका टिपण्णीच्या वादात आता चित्रा वाघ आणि रोहिणी खडसेंमध्येच जुंपल्याचं दिसून येत आहे. रोहिणी खडसेंनी चित्रा वाघ यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केलीय. 

"ओ ऽऽऽऽ मोठ्ठया ताई… (सुप्रिया सुळे), कुठल्याही चांगल्या योजनेला विरोध करणं हे तुमचे कर्तव्यचं आहे ना जणू …? , असे म्हणत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी उत्तर दिले. "अहो चित्राताई, भारतीय जनता पक्षात महिलांना मान सन्मान दिला जातो हे तुम्हाला कुणी सांगितलं बरं? आम्ही अनेक वर्षे तिथे होतो, आम्हाला महित आहे काय आहे ते..... बरं ठिक, तुमचे म्हणणे बरोबर आहे, असे म्हटले तर मग, आदरणीय पंकजाताईवर अन्याय कशासाठी सुरु आहे हो? जरा विचारा ना तुमच्या नेत्यांना...", असा महत्त्वाचा सवाल रोहिणी खडसेंनी केला होता. त्यानंतर, पुन्हा एकदा आणखी एक ट्विट करत रोहिणी खडसेंनी चित्रा वाघ यांच्यावर जबरी टीका केलीय.

अरेच्या चित्राताई, खोट्ट बोलायचं पण रेटून बोलायचं ही तुमच्या नेत्यांची तऱ्हा. ती तुमच्या इतक्या लवकर अंगवळणी पडलीसुद्धा?, असे म्हणत पटलवार केला. आमचा कार्यक्रम आजही सोशल मिडीयावर अपलोड आहे. पुन्हा ऐका. कार्यकर्त्यांना बोलायची संधी ताई आम्हीच दिली बरं का.... कारण त्यांच्या मनात काय आहे ते ऐकून घेतो. आपलेच म्हणणे बरोबर असे नाही करत. कारण आम्ही पक्षातही लोकशाही मानतो. आदेश करत नाही. आम्ही  ‘‘कार्यकर्त्यांची मन की बात’’ ऐकतो. तुम्हाला फक्त नेत्यांच्या ‘मन की बात’ ऐकायची सवय पडलीय. जरा दमानं घ्या. सारं काही समोर दिसत असतांनाही शेरेबाजी केल्याने लोक हसायला लागलेत हो, असे म्हणत चित्रा वाघ यांच्यावर टीका केली..  

चित्रा वाघ काय म्हणाल्या होत्या?

"ओ ऽऽऽऽ मोठ्ठया ताई… (सुप्रिया सुळे), कुठल्याही चांगल्या योजनेला विरोध करणं हे तुमचे कर्तव्यचं आहे ना जणू …? राज्यातील आमच्या भगिनी तुमच्यासारख्या एकरी १०० कोटींची वांगी नाही ना पिकवू शकत ताई… नविन जन्माला येणाऱ्या मुलीला १लाख १ हजार रूपये मिळणार आहेत तर तुमच्या का पोटात दुखतयं? ती लखपती होत असेल तर तुमच्या करोडपतीपणावर थोडीचं कुणी आघात करतयं ? राहिला प्रश्न आमच्या पक्षातील महिलांचा तर तर भाजपा इतकी चांगली वागणूक अन्य पक्षात नाहीचं…. आजच तुमच्या कार्यक्रमात महिलांनी गोंधळ का घातला? त्यांनी तुमच्याच पक्षात डावललं जात असल्याची भावना का व्यक्त केली याचं चिंतन करा मोठ्ठया ताई… आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून …ही तऱ्हा जुनी झाली… ताई, अब पब्लीक सब जानती है … बरं का मोठ्ठ्या ताई," असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले होते.

टॅग्स :रोहिणी खडसेचित्रा वाघमुंबईभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस