‘टू डी इको’, सोनोग्राफीसाठी सायन हॉस्पिटलमध्ये जाच; रुग्णांना उपचार नकोसे; कुटुंबीयही होतात त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 06:09 IST2026-02-20T06:05:14+5:302026-02-20T06:09:46+5:30
तासन्तास रांग लावल्यानंतर १० वाजेपर्यंत हातात टोकन मिळते. उशीर झाल्यास दुसऱ्या दिवशी यावे लागते. एवढी खटपट केल्यानंतर महिना ते दीड महिन्यानंतरची वेळ दिली जाते.

‘टू डी इको’, सोनोग्राफीसाठी सायन हॉस्पिटलमध्ये जाच; रुग्णांना उपचार नकोसे; कुटुंबीयही होतात त्रस्त
खलील गिरकर
मुंबई : पूर्व उपनगरांतील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सायन येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयामध्ये २ डी इको व सोनोग्राफी चाचणी करण्यासाठी रुग्णांना किमान एक ते दीड महिना थांबावे लागत आहे. दाखल रुग्णांना किमान ५-६ दिवस प्रतीक्षा करावी लागते. यामुळे रुग्ण व कुटुंबीयांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ओपीडीमधील रुग्णांना सोनोग्राफीची वेळ घेण्यासाठी सकाळी ८ वाजण्यापूर्वी यावे लागते. तासन्तास रांग लावल्यानंतर १० वाजेपर्यंत हातात टोकन मिळते. उशीर झाल्यास दुसऱ्या दिवशी यावे लागते. एवढी खटपट केल्यानंतर महिना ते दीड महिन्यानंतरची वेळ दिली जाते. रुग्ण दाखल असल्यास त्याची दोन दिवसांनंतर चाचणी केली जाते. २ डी इकोसाठी ओपीडी रुग्णांना १ महिन्यानंतरची वेळ मिळते. दाखल रुग्णांच्या ५-६ दिवस लागतात.
रुग्णालयात दररोज ६ ते ७ हजारांपेक्षा जास्त रुग्ण ओपीडीमध्ये येतात. त्यामुळे ताण आहे. दाखल व ओपीडी रुग्णांसाठी विविध चाचण्यांसाठी, सेवांसाठी नेमका किती कालावधी लागतो याची लेखी माहिती अधिकाऱ्यांकडून मागवण्यात येत आहे.
डॉ. प्रमोद इंगळे, अधिष्ठाता, सायन रुग्णालय रुग्णांची सुरक्षा धोक्यात
दाखल रुग्णांची भेट घेण्याची वेळ ४.३० ते ६.३० असली तरी अनेकदा सुरक्षारक्षकांकडून कोणतीही विचारणा होत नसल्याने कोणीही आगंतुक रुग्णालयात कुठेही फिरून येऊ शकतो. यामुळे दाखल रुग्णांची सुरक्षितता धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वाढत्या गर्दीचा परिणाम : रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण येत असल्याने वाढत्या गर्दीमुळे रुग्णसेवेत अनेक अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. सायन रुग्णालयातील स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि औषध पुरवठा यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.