Join us

'टिस'च्या विद्यार्थ्याचा दारूपार्टीनंतर झोपेतच मृत्यू; कुटुंबीयांनी घेतली मुंबईत धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 06:21 IST

अनुरागच्या मृतदेहाचे राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : टाटा समाजविज्ञान संस्थेच्या (टिस) एमएच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा रविवारी चेंबूरमधील राहत्या फ्लॅटमध्ये मृत्यू झाला. अनुराग जयस्वाल (२९) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. त्याने आदल्या दिवशी वाशी येथे झालेल्या पार्टीत मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केल्याचे समजते. याप्रकरणी चेंबूर पोलिस अधिक तपास करत आहेत. 

मूळचा उत्तर प्रदेशमधील लखनौचा असलेला अनुराग मित्रांसोबत चेंबूर येथील नवजीवन अनुराग जयस्वाल सोसायटीत रहायचा. 'टिस'मधील १५० विद्यार्थी पार्टीसाठी वाशी येथे गेले होते. येथे अनुरागने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केले. पार्टीनंतर रविवारी पहाटे तीनच्या सुमारास अनुराग घरी येऊन झोपी गेला. सकाळी मित्रांनी अनुरागला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो न उठल्याने रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी अनुरागला मृत घोषित केले. अनुरागच्या कुटुंबीयांनी मुंबईत धाव घेतली असून ते मुंबईत पोहचल्यानंतर मुलाचे शवविच्छेदन करण्याची विनंती पोलिसांना केली आहे. अनुरागच्या मृतदेहाचे राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, दारूपार्टीदरम्यान रॅगिंग झाली का? पार्टीत नेमके काय झाले? याबाबत सर्वांकडे पोलिस चौकशी करणार आहेत. प्राथमिक तपासात अतिमद्यप्राशनामुळे मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याने एवढी नशा का केली? त्याला कोणी भाग पाडले का? आणखी काही सेवन केले होते का? याचाही तपास सुरू आहे.

टॅग्स :टाटामुंबईगुन्हेगारी