Times Square experiment at CSMT junction | सीएसएमटी परिसरात ‘टाइम्स स्क्वेअर’ प्रयोग

सीएसएमटी परिसरात ‘टाइम्स स्क्वेअर’ प्रयोग

मुंबई : मुंबई महापालिका, वाहतूक पोलीस आणि ‘ब्लुमबर्ग’च्या ग्लोबल रोड सेफ्टी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात न्यू यॉर्क ‘टाइम्स स्क्वेअर’ प्रयोग राबविण्यात आला होता. वाहतूककोंडी होत असल्यामुळे हा प्रयोग स्थगित करण्यात आला. परंतु याबाबत येत्या काळात काही बदल करून तो पुन्हा सुरू करण्यात येणार आहे़ त्याबाबत चर्चा सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.

टाइम्स स्क्वेअर प्रयोगात अपघातांच्या शक्यतेचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने पादचारी सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यात आले. या बदलांमुळे येथील रस्ते अर्ध्याहून जास्त प्रमाणात अरुंद झाले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होत होती. ज्या ठिकाणी सब-वे आहे त्या ठिकाणी पादचाऱ्यांनी सब-वेचा वापर करावा. ज्या ठिकाणी वाहनांसाठी जागा गरजेची आहे त्या ठिकाणी वाहनांना प्राधान्य देण्यात येईल. तर ज्या ठिकाणी पादचाऱ्यांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे तिथे त्यांना प्राधान्य दिले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

‘टाइम्स स्क्वेअर’ प्रयोगाची जागा वाहतुकीसाठी न वापरता अनेक ठिकाणी वाहनांची पार्किंग, फेरीवाले यांनी व्यापल्याचे पाहायला मिळते. याबाबत आझाद मैदान वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर ढेरे म्हणाले, या जागेत वाहने पार्किंग केली जात असतील तर त्या वाहनांवर कारवाई केली जााणार आहे.

रस्त्याच्या रचनेतील बदलाबाबत चर्चा!
मुंबईत ९७ टक्के नागरिक पादचारी आहेत, कारण बस किंवा रेल्वेने प्रवास केला तरी ते रस्त्याने काही अंतर चालतच जातात. वाहन चालविणारे ३ टक्के आहेत. आपण ९७ टक्के जागा वाहनचालकांसाठी दिली आहे. ‘टाइम्स स्क्वेअर’ प्रयोगातील रस्त्याच्या रचनेत बदल करण्याबाबत चर्चा सुरू आहे. हा प्रयोग सुरू होण्यापूर्वी या परिसरात वाहतूककोंडी होती. आज हा प्रयोग बंद झाला तरी वाहतूककोंडी आहे. पादचाºयांसाठी कोणताही नवीन प्रयोग राबविला तरी सुरुवातीच्या काही दिवसांत वाहतूककोंडी होईलच. नागरिकांना सवय झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल. त्या जागेवर काही ठिकाणी वाहन पार्किंग दिसते, वाहतुकीसाठी वापर होत नाही. आजही ती जागा पादचाºयांसाठी वापरता येऊ शकते.
- अभिमन्यू प्रकाश, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, नॅक्टो

Web Title: Times Square experiment at CSMT junction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.