Join us
Daily Top 2Weekly Top 5

विनातिकीट प्रवाशाकडून टीसी ऑफिसात तोडफोड, रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी वादामध्ये झाले जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 08:33 IST

या प्रवाशाला पुढील कारवाईसाठी रेल्वे पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या तोडफोडीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता.

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकात विनातिकीट पकडलेल्या एका प्रवाशाने तिकीट तपासनीस कार्यालयातील मालमत्तेचे नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याने कार्यालयातील मॉनिटर, सीपीयू, कीबोर्डची तोडफोड केली असून, या वादात रेल्वे कर्मचारी आणि स्वतः प्रवासी जखमी झाला आहे. या प्रवाशाला पुढील कारवाईसाठी रेल्वे पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या तोडफोडीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता.

पश्चिम रेल्वेच्या दादर–विरार फास्ट लोकलमध्ये शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास तिकीट तपासणी सुरू होती. टीसी शमशेर इब्राहिम यांना फर्स्ट क्लासमध्ये दोन  प्रवाशांकडे सेकंड क्लासचे तिकीट आणि एक प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याचे आढळले. या प्रवाशांना बोरिवली स्टेशनवर उतरवून कार्यालयात नेण्यात आले. त्यावेळी एक प्रवाशाने रागाच्या भरात रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान केले.

सेकंड क्लास तिकिट, फर्स्ट क्लास प्रवासपश्चिम आणि मध्य रेल्वेच्या एसी आणि साध्या लोकलने रोज अनुक्रमे ३२ आणि ३६ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यात गर्दीचा फायदा घेऊन अनेक प्रवासी सेकंड क्लास तिकिटावर फर्स्ट क्लास किंवा एसी लोकलमधून प्रवास करतात. अशा प्रवाशांना रोखण्यासाठी दोन्ही मार्गांवर विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येते. शनिवारी घडलेल्या प्रकारामुळे तिकीट तपासनीस आणि प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत अशा त्रासदायक प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मॉनिटर, सीपीयू जमिनीवर आपटला कार्यालयातील मॉनिटर, सीपीयू उचलून जमिनीवर आपटला, कीबोर्ड टेबलावर आपटून त्याचे तुकडे केले. या भांडणात जखमी झालेल्या रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशावर उपचार करण्यात आले आहेत.

टॅग्स :भारतीय रेल्वेप्रवासीरेल्वे