Join us

लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 06:52 IST

रेल्वेच्या यूटीएस ॲपच्या माध्यमातून स्टेशनवर असलेले क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढण्याच्या सुविधेचा प्रवाशांकडून गैरवापर होत आहे.

महेश कोले, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रेल्वेच्या यूटीएस ॲपच्या माध्यमातून स्टेशनवर असलेले क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढण्याच्या सुविधेचा प्रवाशांकडून गैरवापर होत आहे. हे क्यूआर कोड इंटरनेटवरील अनेक वेबसाइटवर सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे तिकीट तपासनीस (टीसी) लोकलमध्ये येताच अनेक विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी तो कोड स्कॅन करून तिकीट काढतात आणि कारवाई तसेच दंड भरण्यापासून वाचवतात. त्यामुळे ही सुविधा तत्काळ बंद करण्यासाठी मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाला पत्र पाठविले आहे.

मुंबई लोकलचे तिकीट काढण्यासाठी रेल्वेने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यापैकी एक म्हणजे यूटीएस ॲप. तिकीट काढताना प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी, त्यांचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी २०१६ मध्ये यूटीएस मोबाइल ॲप्लिकेशन सुरू केले. २०२४ या वर्षात मध्य रेल्वेवर दररोज सुमारे ६ लाख १० हजार प्रवाशांनी तिकीट काढण्यासाठी ‘यूटीएस’चा वापर केला. 

या ॲपच्या माध्यमातून स्टेशनवर क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढता येते. परंतु प्रवाशांकडून आता याचा गैरवापर वाढला आहे. अनेक तिकीट नसलेले प्रवासी चालत्या ट्रेनमधूनदेखील हे कोड स्कॅन करून तिकीट काढत आहेत. 

टीसीला बघताच प्रवासी काढतात तिकीट 

रेल्वेने सध्या यूटीएसच्या माध्यमातून तिकीट काढण्यासाठी असलेली जिओ-फेन्सिंग मर्यादेच्या नियमात बदल करून केवळ स्टेशनच्या आतमध्ये ट्रॅकपासून ३० मीटर ठेवली आहे. परंतु तिकीट खिडकीजवळ असलेल्या क्यूआर कोडच्या माध्यमातून तिकीट काढल्यास ही मर्यादा नाही. याचा अनेक प्रवासी गैरवापर करतात. टीसी लोकलमध्ये आल्यावर जवळच्या स्टेशनचे  क्यूआर कोड ऑनलाइन मिळवून त्याच्या माध्यमातून तिकीट काढतात. 

स्टॅटिक ऐवजी डायनॅमिक क्यूआर कोड 

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगिल्यानुसार, स्टेशनवर असलेले क्यूआर कोड स्थिर आहेत. परिणामी, ते सहज उपलब्ध होऊ शकतात. याऐवजी सतत बदलणारे डिजिटल क्यूआर कोड उपलब्ध केल्यास अशा घटना रोखता येणे शक्य आहे. त्यासाठी सर्व स्टेशनवर डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून डायनॅमिक म्हणजे बदलणारे क्यूआर कोड उपलब्ध केल्यास अशा घटना रोखता येणे शक्य होणार आहे.

 

 

टॅग्स :मुंबई लोकलभारतीय रेल्वेरेल्वे