मुंबईच्या विरार फास्ट लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पुढील कारवाईसाठी रेल्वेच्या कार्यालयात नेले असता तिथे त्याने सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याची बाब समोर आली. या घटनेत एक प्रवासी आणि दोन रेल्वे कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी रेल्वे प्रवाशाविरुद्ध आणि फौजदारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल त्याच्याकडून दंड आकारला जाईल, अशी माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. रेल्वे अधिकारी शमशेर इब्राहिम हे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास नियमित तिकीट तपासणी करत असताना त्यांना विरार फास्ट ट्रेनमध्ये दादर आणि बोरिवली स्थानकांदरम्यान दोन प्रवासी दुसऱ्या श्रेणीच्या तिकिटांसह प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करताना आढळले. तर, अंधेरी आणि बोरिवली दरम्यान एका प्रवाशाकडे तिकीट नसल्याचे आढळून आले. पुढील कारवाईसाठी तिघांना बोरिवली स्थानकावर उतरवण्यात आले आणि टीसी कार्यालयात नेण्यात आले.
दरम्यान, तिकीट तपासणीवरून झालेल्या वादातून एका प्रवाशाने कार्यालयात तोडफोड करायला सुरुवात केली. ज्यात दोन रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी जखमी झाले. रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप जखमींना प्राथमिक उपचारासाठी पाठवले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी प्रवाशाला ताब्यात घेतले. या घटनेमुळे प्रवाशांच्या वर्तनाबद्दल आणि नियमित तपासणी दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे.
एका रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "आरोपी प्रवाशावर योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याच्यावर रेल्वे आणि फौजदारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. नुकसान झालेल्या सरकारी मालमत्तेची चौकशी केली जाईल आणि त्याच्याकडून तितका दंड वसूल करण्यात येईल."