Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात 18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान वादळी पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 16:49 IST

नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे.

मुंबई- नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे. परंतु १८ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात दुपारनंतर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या दरम्यान मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर; कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी; तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांतील काही भागात ढगाळ वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज आहे. याचबरोबर नाशिक, धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्यातील काही भागात १९ ते २० दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे मतदेखील हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे. हवामानाची ही परिस्थिती आगामी आठवड्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात कायम राहण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. 

शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करताना काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. या कालावधीत लोकांनी दुपारनंतर येणाऱ्या वादळ आणि वीजांपासून आपले संरक्षण करावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.

टॅग्स :पाऊस