टाईमपास म्हणून फोन करत सलमानला ठार मारण्याची धमकी; राजस्थानचा अल्पवयीन मुलगा ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 06:35 IST2023-04-12T06:34:32+5:302023-04-12T06:35:14+5:30
सिने अभिनेता सलमान खान याला ठार मारण्याच्या धमकीच्या फोनने खळबळ उडाली आहे.

टाईमपास म्हणून फोन करत सलमानला ठार मारण्याची धमकी; राजस्थानचा अल्पवयीन मुलगा ताब्यात
मुंबई :
सिने अभिनेता सलमान खान याला ठार मारण्याच्या धमकीच्या फोनने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने राजस्थानच्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपीने टाईमपास म्हणून फोन केल्याचे पोलिसांना सांगितले.
मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात सोमवारी रात्री सव्वानऊ वाजता एका अनोळखी व्यक्तीने फोन करत स्वत:चे नाव रॉकी भाई सांगितले. गोशालारक्षक असून जोधपूर, राजस्थान येथून बोलत असल्याचे सांगितले.
‘मी ३० तारखेला सलमान खानला मारणार आहे, त्याला सांगून द्या’, असे बोलून त्याने फोन कट केला. याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
मोबाइल लोकेशनच्या आधारे शाेधले
गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने आरोपीच्या मोबाइल लोकेशनच्या आधारे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील डोळखांब येथून फोन आल्याचे शोधले.
त्यानुसार, तेथे जाऊन साथीदारांच्या मदतीने दुचाकीवरून पळून जात असताना पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याने टाईमपास म्हणून फोन केल्याचे पोलिसांना सांगितले.
अल्पवयीन मुलगा मूळचा राजस्थान येथील रहिवासी असून, शहापूर येथे नातेवाइकांकडे आला असताना त्याने हा फोन केला होता.