ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 10:42 IST2025-07-04T10:34:37+5:302025-07-04T10:42:04+5:30
मुनगंटीवार म्हणाले, कल्पना आहे की आपल्याकडे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेची नियमात तरतूद आहे; पण मी १९९५ पासून या सदनाचा सदस्य आहे. कधी इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका पाहिली नव्हती.

ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
मुंबई : मी १९९५ पासून विधानसभेत आहे; पण कधी इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका बघितली नव्हती. आज पहिल्यांदाच मला इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका मिळाली आहे, असा घरचा अहेर भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत दिला.
विधानसभाध्यक्षांनी नियम समितीची बैठक घेऊन इंग्रजी शब्दच काढून टाकावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ९ सदस्यांनीच माझ्याकडे इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका असावी अशी मागणी केली होती, असे सांगितले.
मराठी अभिजात झाली मग इंग्रजीला आलिंगन का?
मुनगंटीवार म्हणाले, कल्पना आहे की आपल्याकडे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेची नियमात तरतूद आहे; पण मी १९९५ पासून या सदनाचा सदस्य आहे. कधी इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका पाहिली नव्हती.
आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मग इंग्रजीला आलिंगन का द्यायचे?
मराठी आली पाहिजे, असा आपला प्रयत्न असतो. ज्यांना येत नाही त्यांना हिंदीचा पर्याय आहे. मग हे इंग्रजीला आलिंगन कशाला. एकतर मराठी आलीच पाहिजे. अगदीच अडचण असेल तर हिंदी चालेल; पण ज्याला इंग्रजीच हवी आहे त्याला पासपोर्ट काढून इंग्लंडला पाठवा.