ज्यांच्यासाठी जगलो तेच आता छळतात; ज्येष्ठ नागरिकांनो, घाबरू नका ! मदतीसाठी ‘एल्डर लाइन’वर त्वरित फोन करून संकटमुक्त व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 14:09 IST2025-09-28T14:07:19+5:302025-09-28T14:09:45+5:30
ज्येष्ठांना धीर देण्यासोबतच त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी १४५६७ या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

ज्यांच्यासाठी जगलो तेच आता छळतात; ज्येष्ठ नागरिकांनो, घाबरू नका ! मदतीसाठी ‘एल्डर लाइन’वर त्वरित फोन करून संकटमुक्त व्हा!
मुंबई : ज्येष्ठांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. कधी एकटे राहावे लागते तर कधी आयुष्य आजारपणात घालवावे लागते. सोबत कुणी असले तरी मानसिक एकटेपणा जाणवतो. अशा वेळी त्यांना कोणी तरी आधार देणारे लागते. मात्र, महामुंबईसारख्या वेगाने धावणाऱ्या शहरात कुणासाठीच कुणाकडे वेळ नाही. ज्यांच्यासाठी जगलो, त्यांच्याकडून छळ होत आहे. अशा प्रसंगात ज्येष्ठांसाठी हेल्पलाइन (एल्डर लाइन) सुरू करण्यात आली आहे. यावर संपर्क साधल्यास त्वरित मदत मिळते.
अनेकदा मुलांना आपल्या घरातील जन्मदात्यांसह वडीलधाऱ्यांना वेळ देता येत नाही. अनेकांची मुले परदेशी असल्याने मुंबईत एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा प्रसंगात ज्येष्ठांना धीर देण्यासोबतच त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी १४५६७ या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. यावर ज्येष्ठांना आरोग्य व त्याबद्दल जागरुकता, आहार, डे-केअर सेंटर, वृद्धाश्रम, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, कला, मनोरंजन इत्यादीची माहिती मिळते. कायदेविषयक (वैयक्तिक व कौटुंबिक स्तरावर दोन्ही), विवाद निराकरण (मालमत्ता, सामाजिक सुरक्षा), आर्थिक, पेन्शन संबंधित सल्ला, सरकारी योजनांची माहिती त्वरित दिली जाते. चिंता निराकरण भावनिक समर्थन, चिंता निराकरण, जीवन व्यवस्थापन या विषयांबाबत मार्गदर्शन केले जाते. क्षेत्रीय पातळीवर मदत होते. विविध सरकारी, निमसरकारी, सामाजिक संस्था यांची माहिती मिळते.
अशा प्रकारे मिळतो फायदा?
काही दशकांपासून ज्येष्ठांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या अडचणी व समस्यांमध्ये वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून हेल्पलाइन तयार केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना घरी बसूनच हेल्पलाइनवर संपर्क साधता असून, त्यांना फाेनवरूनच त्वरित मदत मिळत आहे.
सरकारने सुरू केलेली हेल्पलाइन महत्त्वाची व आधाराची सेवा आहे. ज्येष्ठांना, इतरांना पण एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांना खूप फायदा होत आहे. तसेच आधार मिळत आहे. माझे कुणी ऐकायला आहे व मला हवी असलेली माहिती मिळते, ही भावना ज्येष्ठांसाठी सुखावह आहे.
प्रकाश बोरगावकर, आजी केअर सेवक फाउंडेशन
ज्येष्ठांना धीर देण्यासोबतच त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी १४५६७ या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.