यंदा ११,५२८ मुंबईकर कार, बाइकने फिरणार; गतवर्षीच्या तुलनेत वाहन नोंदणीत घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 08:30 IST2025-10-24T08:30:06+5:302025-10-24T08:30:47+5:30
दसरा आणि दिवाळी हा काळ वाहन खरेदीसाठी शुभ मानला जातो.

यंदा ११,५२८ मुंबईकर कार, बाइकने फिरणार; गतवर्षीच्या तुलनेत वाहन नोंदणीत घट
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दिवाळीनिमित्त यंदा मुंबईतील चारही प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) ११,५२८ नव्या वाहनांची नोंदणी झाली. यात बहुसंख्य नागरिकांनी दुचाकी खरेदीला प्राधान्य दिले असून, कार खरेदीत मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत घट दिसून आली आहे. १३ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या या नोंदणीमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत एकूण वाहन नोंदणीच्या आकडेवारीत थोडी घट झाली आहे.
दसरा आणि दिवाळी हा काळ वाहन खरेदीसाठी शुभ मानला जातो. त्यामुळे धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि पाडवा या दिवशी शोरूममध्ये खरेदीदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या काळात वाहनांच्या वितरणासाठी ग्राहकांकडून पूर्वनोंदणी आणि प्रक्रिया काही दिवस आधीच सुरू करण्यात आली होती.
बाइकलाच पसंती
२०२५ मध्ये मुंबई सेंट्रल, अंधेरी, बोरीवली आणि वडाळा या चार आरटीओंमधून एकूण ८,५४४ बाईक आणि ३,०२४ कारची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या अनुक्रमे ८,२५३ आणि ३,४०९ होती. म्हणजेच दुचाकी नोंदणी २९१ ने वाढली, तर कार नोंदणी ३८५ ने कमी झाली आहे.
यावर्षी वडाळा आरटीओमध्ये सर्वाधिक बाईक नोंदणी झाली असून ती २,९१६ वर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये ४०० ने वाढ नोंदवली आहे. तर मुंबई सेंट्रल आरटीओमध्ये २५७ ने बाईक नोंदणीमध्ये वाढ नोंदवली आहे.
२०२५ वाहन नोंदणी (१३ ते २२ ऑक्टोबर)
आरटीओ बाइक कार
मुंबई सेंट्रल २,२५६ ८२६
अंधेरी १,६६८ ७०९
बोरीवली १,७११ ७४६
वडाळा २,९१६ ७४६
२०२४ वाहन नोंदणी (२४ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर )
आरटीओ बाइक कार
मुंबई सेंट्रल १९९९ ८४०
अंधेरी १७०२ ८६५
बोरीवली २०३७ ८१४
वडाळा २५१६ ८९०