Join us
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेत्याचं हे ट्विट धक्कादायक; पवारांवरील टीकेला फडणवीसांनीच दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 20:32 IST

अदानी उद्योग समुहात शेल कंपन्यांच्या माध्यमातून आलेले २० हजार कोटी रुपये कुठून आले? व हा पैसा कोणाचा?

मुंबई - काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी अदानी उद्योग समुहावरून भारतीय जनता पक्षाला संसदेसह सगळीकडे धारेवर धरले आहे. एकीकडे काँग्रेसने अदानींच्या चौकशीचा मुद्दा लावून धरला असतानाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी अदानींच्या उद्योग व्यवसायचं देशासाठी असलेलं योगदान सांगितलंय. त्यामुळे, काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगल्याचं दिसून येतेय. सोशल मीडियातूनही काँग्रेस नेते शरद पवारांच्या भूमिकेवर व्यक्त होत आहेत. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी ट्विट करुन शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यावर, देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत प्रत्त्युत्तर दिलंय.  

अदानी उद्योग समुहात शेल कंपन्यांच्या माध्यमातून आलेले २० हजार कोटी रुपये कुठून आले? व हा पैसा कोणाचा? हे जाणून घेण्याचा देशातील जनतेला अधिकार आहे. राहुल गांधी यांनी ही मागणी लावून धरली असून काँग्रेस पक्षासह देशातील विविध राजकीय पक्षांनी अदानी घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून व्हावी अशी मागणी केलेली आहे. अदानी प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक झाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानींचे देशाच्या प्रगतीत योगदान असल्याचे म्हटल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी ट्विट करुन शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्न उभारत त्यांच्यावर टीका केली. मात्र, ही टीका न रुचल्याने लांबा यांना देवेंद्र फडणवीस यांनीच प्रत्त्युत्तर दिलंय. 

''भित्रे, स्वार्थी लोक स्वत:च्या हितासाठी हुकूमशाही सत्ताधीशांचे गुणगान गात आहेत. पण, राहुल गांधी एकटे देशातील जनतेसाठी लढाई लढत आहेत. तसेच, भांडवलदार चोर आणि चोरांना संरक्षण देणाऱ्या चौकीदाराशीही," असं अलका लांबा यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. या ट्विटसोबत शरद पवार आणि अदानी यांचा एक फोटोही शेअर केलाय. त्यावर, आता फडणवीसांनी उत्तर देताना, राहुल गांधींमुळे देशाचं राजकारण घाणेरडं होत असल्याचं म्हटलंय. "राजकारण हे होतच राहील. पण, काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांचा 35 वर्ष मित्रपक्ष असलेल्या आणि भारतातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेत्यांपैकी एक, तर महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री असलेल्यांबद्दल केलेले ट्विट धक्कादायक आहे. राहुल गांधीमुळे देशातील राजकीय संस्कृतीत घाणेरडे राजकारण होत आहे, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. 

दरम्यान, शरद पवार यांनी अदानी उद्योग समूहाचे समर्थन करावे, त्यांचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे असे म्हणावे याचा अर्थ काय समजायचा असे काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राहूल गांधी यांनी देशभर निर्माण केलेला टेंपो पवार यांच्या एका वक्तव्यामुळे कमी झाला, अशीही अनेकांची भावना आहे.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशरद पवारराहुल गांधीकाँग्रेस