हे शांतता क्षेत्र आहे... फटाके फोडण्याचे ठिकाण नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:02 IST2025-10-20T12:01:41+5:302025-10-20T12:02:13+5:30
छत्रपती शिवाजी महाराज पार्क रेसिडेंट्स असोसिएशनचे पोलिसांना पत्र

हे शांतता क्षेत्र आहे... फटाके फोडण्याचे ठिकाण नाही!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दादरमधील शिवाजी पार्क मैदान म्हणजे फटाके फोडणाऱ्यांसाठी हक्काची जागा मानली जाते. मात्र, उच्च न्यायालयाने शांतता क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या या क्षेत्रात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ज्येष्ठ नागरिकांसह, स्थानिक रहिवाशांना ध्वनी प्रदूषणासोबत वायू प्रदूषणाचाही सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज पार्क रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन (एलएम) तर्फे शिवाजी पार्क पोलिस स्थानकात निवेदन देऊन उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० नंतर फटाके फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
न्यायालयाने शिवाजी पार्कात फटाके फोडण्याची वेळ रात्री ८ ते १० अशी निश्चित केली आहे. मात्र, दरवर्षी या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असून, शेकडो लोक उशिरापर्यंत पार्कमध्ये फटाके फोडत राहतात. या अनियंत्रित ध्वनी व धुरामुळे ज्येष्ठ नागरिक, मुले व रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो, असे संघटनेचे म्हणणे आहे.
ध्वनिप्रदूषणात आघाडीवर; वयोवृद्ध, लहान मुलांना त्रास
दिवाळीत होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या मोजणीत मरिन ड्राइव्ह प्रमाणे शिवाजी पार्कात सर्वात पुढे असते. येथे रात्री ११ पर्यंत १०० डेसिबल किंवा त्याच्याहून अधिक आवाजाचे फटाके फोडले जातात.
जमिनीवरून फटाक्यांच्या आवाजाचा अंदाज येत नसला तरी वरच्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होतो. या आतषबाजीमुळे हवेतील प्रदूषणात मोठी वाढ होते. हे ध्वनी आणि वायू प्रदूषण वयोवृद्ध, तसेच लहान मुलांच्या आरोग्यास हानिकारक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
कलाकार, खेळाडूंचीही जबाबदारी
शिवाजी पार्क परिसर हे मुंबईतील सर्वाधिक गजबजलेले आणि प्रतिष्ठित ठिकाण मानले जाते. येथे अनेक ज्येष्ठ नागरिक, कलाकार, तसेच खेळाडू राहतात. त्यामुळे ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवणे ही केवळ कायदेशीर नव्हे तर सामाजिक जबाबदारीही आहे, असेही रहिवाशांनी यावेळी नमूद केले आहे.