Join us

यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 05:25 IST

मोदी सरकारला सत्तेतून पायउतार करायचे आहे. तसे केले नाही तर त्याचे दुष्परिणाम येणाऱ्या अनेक पिढ्यांना भोगावे लागतील, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: यंदाची निवडणूक सोपी नाही. ती देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. मोदी सरकारला सत्तेतून पायउतार करायचे आहे. तसे केले नाही तर त्याचे दुष्परिणाम येणाऱ्या अनेक पिढ्यांना भोगावे लागतील, असा इशारा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ कांजूरमार्ग येथील सभेत ते बोलत होते.

१० वर्षे मोदी यांचा कारभार पहात आहोत. ते बोलतात एक आणि करतात दुसरे. सत्ता हातात द्या, महागाई कमी करतो, असे आश्वासन त्यांनी दिले होते. सत्तेवर येताच तीन महिन्यात सिलिंडरचे दर ५० टक्क्यांनी कमी करतो, असे बोलले होते. पण, दर मात्र काही कमी झाले नाहीत. महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, कारखानदारी कमकुवत झाली. शेतमालाचे भाव पडले, असे पवार म्हणाले. ज्या राज्यात विरोधी पक्षांची सरकारे चांगली कामे करत आहेत, त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकले गेले. केजरीवाल यांनी दिल्लीचा चेहरा बदलला. पण, त्यांनी मोदींवर टीका केली म्हणून त्यांना जेलमध्ये टाकले. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे तेच झाले. अनिल देशमुख यांनाही तुरुंगात टाकले. त्यामुळे मोदी यांच्या १० वर्षांच्या कारभाराचा लेखाजोखा मांडण्याची वेळ आली असून या निवडणुकीने ही संधी दिली आहे, असे ते म्हणाले.

मोदी यांनी महाराष्ट्राचा धसका घेतला आहे, त्यामुळे इथे ते ढिगाने सभा घेत आहेत. मुंबईत त्यांचा रोड शो आहे. ४ जूनला त्यांना रस्त्यावर आणणार आहोत, असे खासदार संजय राऊत म्हणाले. मुंबई त्यांच्या पराभवाचा केंद्रबिंदू ठरेल, असेही भाकीत केले. अमित शाह यांनी मोदी यांचा पासपोर्ट जप्त केला पाहिजे, कारण निकालानंतर ते परागंदा होणार आहेत. त्यांच्यावर देशद्रोहापासून ते भ्रष्टाचारापर्यंत खटले भरले जाणार आहेत, असा इशारा राऊत यांनी दिला.

टॅग्स :शरद पवारमुंबईमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४