असेही रक्षाबंधन; बहिणीची किडनी भावाला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 11:00 IST2025-08-09T11:00:37+5:302025-08-09T11:00:48+5:30

शीतल यांनी भावासाठी केलेला हा त्याग निश्चितच या उत्सवाच्या निमित्ताने हृदयस्पर्शी ठरला आहे.

This is Raksha Bandhan; Sister gifts kidney to brother | असेही रक्षाबंधन; बहिणीची किडनी भावाला भेट

असेही रक्षाबंधन; बहिणीची किडनी भावाला भेट

मुंबई  : रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीची माया, विश्वास आणि नात्याच्या गाठी घट्ट करणारा पवित्र सण. काहींनी हे नाते त्यापलीकडे जपले आहे. अशाच एक आहेत शीतल वाळके. यंदा त्यांना आपला लाडका भाऊराया प्रवीण मानकर याच्या बरोबर हा सण साजरा करता येणार नाही. कारण त्या मुंबईतील एका रुग्णालयात भावाला किडनी दान करून आपल्या गावी परतल्या आहेत. तर, प्रवीण हे या स्थितीत संसर्ग होऊ नये म्हणून काही काळ मुंबईलाच थांबणार आहेत. शीतल यांनी भावासाठी केलेला हा त्याग निश्चितच या उत्सवाच्या निमित्ताने  हृदयस्पर्शी ठरला आहे.

प्रवीण (वय ४६) यांना काही दिवसांपूर्वी मूत्रपिंडाच्या (किडनी) आजाराचे निदान झाले. त्यांना तातडीने किडनी प्रत्यारोपणाची गरज होती. या कठीणप्रसंगी त्यांच्या लहान बहिणीने, शीतल यांनी कोणतेही भय न बाळगता पुढे येत त्यांची एक किडनी दान केली. हे प्रत्यारोपण मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये १५ मे रोजी यशस्वी झाले.

‘आम्ही दोन भाऊ आणि ती आमची लहान बहीण. जेव्हा माझी किडनी निकामी झाल्याचे समजले, तेव्हा घरात कोण दान करू शकेल, यावर विचार सुरू झाला. माझी पत्नी पुढे आली; पण वैद्यकीयदृष्ट्या ती योग्य नव्हती. तेव्हा शीतलने चाचण्या करून घेतल्या. तिचा रक्तगट जुळला. तिने ठामपणे किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. खरे सांगायचे तर, तिने मला दुसरा जन्म दिला, अशी भावनिक प्रतिक्रिया प्रवीण यांनी व्यक्त केली. 
 प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर  प्रवीण यांना काही काळ मुंबईतच राहावे लागणार आहे. तर, शीतल पुन्हा आपल्या मूळगावी अमरावतीला परत गेल्या आहेत. त्यामुळे अनेक वर्षांनी प्रथमच यंदा त्यांचे रक्षाबंधन एकत्र साजरे होणार नाही. मात्र, त्यांनी एकमेकांना दिलेले हे ‘अनोखी भेट’ अनमोल ठरली आहे.

प्रवीण मानकर यांना किडनी दान करून शीतळ वाळके या बहिणाबाईने त्यांचा प्राण वाचविला. यंदा त्यांना रक्षाबंधन साजरा करता येणार नाही. गेल्या वर्षी या भावंडानी हा उत्सव साजरा केला त्यावेळचा हा हृदयस्पर्शी क्षण.

बॉम्बे हॉस्पिटलमधील प्रवीण यांच्यावर उपचार करणारे मूत्र विकारतज्ज्ञ डॉ. श्रीरंग बिच्चू यांनी सांगितले, एखाद्या व्यक्तीने किडनी दुसऱ्याला दान करणे ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती एक अतिशय मोठी भावनिक आणि मानसिक तयारी असते. शीतल यांचे हे काम खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. 

यंदाचे रक्षाबंधन 
‘व्हिडीओ कॉल’वर 
आमची एकही राखी पौर्णिमा चुकलेली नाही. मात्र यावर्षी भावाची मोठी शस्त्रक्रिया झाली असून, संसर्ग होऊ नये तसेच डॉक्टरांना सतत भेटावे लागते यामुळे तो काही काळ मुंबईलाच राहणार आहे. त्यामुळे यावर्षी एकत्र येऊन रक्षाबंधन साजरे करणार नाही. मात्र ‘व्हिडिओ कॉल’वर मायेचा उत्सव साजरा करू. मला  माझ्या भावाला किडनी दान केल्याचा अभिमान आहे.  
शीतल वाळके
 

Web Title: This is Raksha Bandhan; Sister gifts kidney to brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.