तपास थांबला अन् श्वासही! वाट पाहातच वृद्धेने सोडला जीव, लक्ष्मी नाईक हत्याकांडाचा असाही शेवट

By मनीषा म्हात्रे | Updated: February 6, 2025 06:25 IST2025-02-06T06:23:33+5:302025-02-06T06:25:24+5:30

-मनीषा म्हात्रे मुंबई : घराची बेल वाजली की उशीखाली ठेवलेला चाकू उचलायचा, टेबलावर ठेवलेल्या संशयित जोडप्याच्या फोटोवर नजर मारत ...

This is how the Lakshmi Naik murder case ended, the old woman lost her life while waiting | तपास थांबला अन् श्वासही! वाट पाहातच वृद्धेने सोडला जीव, लक्ष्मी नाईक हत्याकांडाचा असाही शेवट

तपास थांबला अन् श्वासही! वाट पाहातच वृद्धेने सोडला जीव, लक्ष्मी नाईक हत्याकांडाचा असाही शेवट

-मनीषा म्हात्रे
मुंबई : घराची बेल वाजली की उशीखाली ठेवलेला चाकू उचलायचा, टेबलावर ठेवलेल्या संशयित जोडप्याच्या फोटोवर नजर मारत दरवाजाकडे त्या धावायच्या. दुसऱ्या हातात मोबाइल घेत पोलिसांचा नंबर डायल करून दरवाजाच्या भिंगातून पाहात मगच दरवाजा उघडायचा. जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी अशा प्रकारे बहिणीच्या मारेकऱ्याचा शोध घेतला. पण त्यांनाही मृत्यूने गाठले आणि एका हत्याकांडाचा तपास पोलिसांच्या पटलावर अपूर्ण या यादीतच राहिला...

१७ एप्रिल २०१४  या दिवशी मुलुंडच्या गव्हाणपाडा परिसरात लक्ष्मी नाईक या ७० वर्षीय वृद्धेच्या निर्घृण हत्येने खळबळ उडाली. चार बहिणी आणि दोन भाऊ या नाईक परिवारातील लक्ष्मी या सर्वांत थोरल्या. आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांनीच बहीण-भावंडांचा सांभाळ करत मार्गाला लावले. गेल्या २५ वर्षांपासून लक्ष्मी गव्हाणपाड्यात राहायच्या. 

पतीच्या निधनानंतर त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. अंथरुणातच खिळलेल्या लक्ष्मी यांना बहीण लीला यांची सोबत होती. लक्ष्मी यांना मिळणारी पेन्शन आणि घरकामातून लीला यांना मिळणाऱ्या चार पैशातून दोघी जीवन कंठत होत्या. १७ एप्रिल रोजी मात्र आक्रित घडले. 

कामावरून परतलेल्या लीला यांना लक्ष्मी निपचित पडलेल्या दिसल्या. त्यांच्या अंगावरचे सोनेही गायब होते. लुटीच्या उद्देशाने त्यांची हत्या झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. नवघर पोलिसांनी तपास केला. पण हाती काहीच लागले नाही. अखेर तपासाची फाइल बंद झाली. 

यापूर्वी लीला यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार १७ एप्रिल रोजी परिसरात एक दाम्पत्य पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात आले. लीला यांनी त्यांना पाणी दिले. पण दाम्पत्यापैकी महिलेने स्वयंपाकघरात घुसण्याचा प्रयत्न केला. 

लीला यांनी तिला ताकीद देत बाहेर काढले. तसे ते दोघे गेलेही. लीलाही मग कामावर निघून गेल्या. परंतु सायंकाळी घरी आल्यानंतर मात्र त्यांना लक्ष्मीचा मृतदेह पाहावयास मिळाला. मधल्या काळात त्या दाम्पत्यानेच डाव साधल्याचा संशय होता. तेव्हापासून लीला त्या संशयित दाम्पत्याचा शोध घेत होत्या. 

‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’

लक्ष्मी नाईक हत्याकांड हे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. आजही अशा कित्येक वृद्धांच्या हत्येच्या घटनांचा तपास अपूर्णच आहे. धक्कादायक बाब म्हणजे, राज्यात सर्वाधिक वृद्धांच्या हत्या झाल्याचे एनसीआरबीच्या अहवालातून उघड झाले. 

गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण कमी आहे. असेच चित्र अन्य गुन्ह्यांमध्येही आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांच्या फायली बंद झाल्या, तर ज्या गुन्ह्यांत आरोपींना अटक झाली, त्या गुन्ह्यांत ठोस पुराव्याअभावी त्यांची सुटका झाल्याच्याही घटनाही मुंबईत घडल्या. ‘’तेरी भी चूप और मेर भी चूप’’सारखे बरेच गुन्हे दाबले जातात, तर काही गुन्ह्यांची उकल होते.

‘ती’ इच्छा अपुरीच राहिली

तपासात सीसीटीव्ही फुटेजमध्ये तेच जोडपे लक्ष्मी यांच्या हत्येच्या घटनेच्या काही तासांनी इमारतीबाहेर पडताना दिसले होते. मात्र, त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. ते दोघेच बहिणीचे मारेकरी आहेत, हा समज लीला यांच्या डोक्यात पक्का बसला आणि तेव्हापासून त्या उशाशी चाकू ठेवू लागल्या. 

प्रत्येकाकडे संशयित नजरेने पाहू लागल्या. दाराची बेल वाजली तरी चाकू हातात घेऊनच दरवाजा उघडू लागल्या. बहिणीच्या मारेकऱ्यांचा शोध त्यांची नजर घेत होती.

वृद्धापकाळाने लीला थकल्या आणि  त्यांचा मृत्यू झाल्याचे शेजाऱ्यांकडून समजले. बहिणीच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याची त्यांची इच्छा अपुरीच राहिली.

Web Title: This is how the Lakshmi Naik murder case ended, the old woman lost her life while waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.