राजाबाई टॉवरचा असा झाला जीर्णोद्धार, वास्तुविशारद ब्रिंदा सोमाया यांनी उलगडला प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 10:46 AM2023-12-01T10:46:43+5:302023-12-01T10:50:09+5:30

Rajabai Tower : मुंबईत येणाऱ्या नवागताला येथील समुद्राबरोबरच उंच उंच इमारती आणि ऐतिहासिक वास्तूंचे प्रचंड आकर्षण असते. त्यातीलच एक म्हणजे मुंबई विद्यापीठ परिसरात दिमाखात उभे असलेले २८० फूट उंचीचे राजाबाई टॉवर होय.

This is how Rajabai Tower was restored, the journey revealed by architect Brinda Somaya | राजाबाई टॉवरचा असा झाला जीर्णोद्धार, वास्तुविशारद ब्रिंदा सोमाया यांनी उलगडला प्रवास

राजाबाई टॉवरचा असा झाला जीर्णोद्धार, वास्तुविशारद ब्रिंदा सोमाया यांनी उलगडला प्रवास

मुंबई - मुंबईत येणाऱ्या नवागताला येथील समुद्राबरोबरच उंच उंच इमारती आणि ऐतिहासिक वास्तूंचे प्रचंड आकर्षण असते. त्यातीलच एक म्हणजे मुंबई विद्यापीठ परिसरात दिमाखात उभे असलेले २८० फूट उंचीचे राजाबाई टॉवर होय. व्हिक्टोरिअन गॉथिक शैलीचा उत्तम नमुना असलेल्या या टॉवरसह विद्यापीठाच्या ग्रंथालय इमारतीचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला. 

राजाबाई टॉवरच्या जीर्णोद्धाराचा प्रवास प्रख्यात वास्तुविशारद ब्रिंदा सोमाया यांनी उलगडून दाखवला. निमित्त होते १९ ते २५ नोव्हेंबर हा नुकताच झालेला जागतिक वारसा सप्ताह. आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी प्रेमचंद रायचंद यांचे पणतू सुशील प्रेमचंद यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, अभ्यासक, संशोधक उपस्थित होते. 

 अशी झाली उभारणी
 विश्वविख्यात ब्रिटिश वास्तुविशारद सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट यांनी सुंदर इमारतीचे आरेखन केले.
 प्रेमचंद रायचंद यांच्या देणगीतून उभारलेल्या टॉवरचे बांधकाम १८७८ ला पूर्णत्वास आले. 
 राजाबाई टॉवर ही मुंबईतली त्या काळातली आणि त्यानंतर प्रदीर्घ काळ सर्वात उंच ठरलेली इमारत होती. 
 इमारतीच्या जीर्णोद्धाराच्या पहिल्या टप्प्यात स्थानिक कुशल कारागीर आणि साहित्य वापरण्यात आले. 
 दुसऱ्या टप्प्यात फर्निचर, प्रकाश डिझाइन आणि लँडस्केपिंग यांचा समावेश करण्यात आला.
 इंडियन हेरिटेज सोसायटीच्या समन्वयातून, टीसीएसच्या देणगीतून आणि एसएनके कन्सल्टन्टच्या माध्यमातून हे जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वास आले.

जागतिक दर्जाच्या ‘अ’ श्रेणीच्या या वारसा स्थळाच्या जतन आणि संवर्धनासाठी २०१८ ला युनेस्को एशिया पॅसिफिक अवाॅर्ड फॉर कल्चरल हेरिटेज काँझर्वेशन प्रदान.

टॉवरची वैशिष्ट्ये
 चारही बाजूला लुंड अँड ब्लॉकली कंपनीचे असलेले घड्याळ
 टॉवरच्या बांधकामासाठी वापरलेला बेसाल्ट दगड, पांढऱ्या चुनखडीतील कोरीव कामासाठी पांढरट दगड, लाल दगड यांचा येथे वापर करण्यात आला.
 इमारतीत वापरलेले सागवानी लाकूड ब्रह्मदेशातून मागविण्यात आले हाेते.

सुंदर कमानी, लाकडी तख्तपोशी, मिंटन फरशा, बारीक कोरीव काम केलेले मोठे सज्जे, बारीक कोरीव काम केलेली कॅपिटल्स, भव्य पॅसेज, रंगीत काचांचा वापर, सर्पिल आकाराचे वळणदार जिने, टर्रेट्स म्हणजे छोटे छोटे मनोरे आणि त्यांना दिलेले देखणे आधारस्तंभ ही या वास्तुकामाची काही खास वैशिष्ट्ये.

Web Title: This is how Rajabai Tower was restored, the journey revealed by architect Brinda Somaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई