असे जन्माला आले कालिदासाचे मेघदूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 08:46 IST2025-02-23T08:46:21+5:302025-02-23T08:46:28+5:30

कालिदासाचे मेघदूत हे पुस्तक आणि तेही कुसुमाग्रजांचा स्पर्श झालेले, तेव्हा हे पुस्तक फक्त पूर्वमेघ त्रेसष्ट आणि उत्तरमेघ चोपन्न श्लोकांचे छोटेसे असले तरी ते दिमाखात प्रसिद्ध करावे असा मला मोह झाला. 

This is how Kalidasa's Meghdoot was born | असे जन्माला आले कालिदासाचे मेघदूत

असे जन्माला आले कालिदासाचे मेघदूत

- रामदास भटकळ

‘मौज’ साप्ताहिक होतकरू लेखकांना संधी आणि उत्तेजन देत असे, तर त्यांच्या दिवाळी अंकासाठी ज्येष्ठ लेखक आवर्जून लिहीत असत. १९५५ साली दिवाळी अंकात कुसुमाग्रजांचे ‘कालिदासाचे मेघदूत’ हे खंडकाव्य प्रसिद्ध झाले. कविकुलगुरू कालीदास हे सर्वांनाच लोभावणारे. काव्य मराठीत उपलब्ध केल्याबद्दल कुसुमाग्रजांसबंधी कृतज्ञतेची भावना होतीच. शिवाय त्यांच्या शब्दकलेचा डौल काहीसा अपूर्व होता. मूळ संस्कृत मी माझ्या परीने वाचले होते. त्या आधी ‘मेघदूता’ची कृष्णशास्त्री चिपळूणकर, चिंतामणराव देशमुख, आदींनी भाषांतरे केल्याचे मला सांगण्यात आले; पण मला त्याचा काहीच गंध नव्हता.

कुसुमाग्रजांनी आपल्या सोयीचे वृत्त स्वीकारले होते. मला वृत्त, छंद यांची फारशी जाण नव्हती. आणि खरे तर त्यात स्वारस्य नव्हते. ते भाषांतर मुळाबरोबर तपासून घेण्याची मला आवश्यकता वाटली नाही. मी वाचता वाचता त्या ढगासोबत उंच आकाशात वावरत होतो. मौज प्रकाशनाला नुकतीच सुरुवात झाली होती. तेव्हा हे पुस्तकरूपाने भागवतच प्रकाशित करणार अशी माझी समजूत होती; पण त्यांचा तसा इरादा दिसेना.

कुसुमाग्रजांचा ‘विशाखा’ हा कवितासंग्रह वि. स. खांडेकर यांच्या आशीर्वादाने कोल्हापूरहून प्रसिद्ध झाला होता, तो माझ्या जन्माआधी. त्यानंतर त्यांचे साहित्य पुण्यातील काही मातब्बर प्रकाशकांनी प्रसिद्ध केले होते आणि ते भाषांतर अहमहमिकेने मागून घेतील अशी माझी अपेक्षा होती; पण कोणीही तशी हालचाल केल्याचे दिसेना. पॉप्युलर प्रकाशनाचा कार्यक्रमही मर्यादित होता; मी नवसाहित्याने भारावलो होतो. तरी कुसुमाग्रज यांच्याशी संबंध मला हवाहवासा वाटला. मी विष्णुपंतांना विचारून खुंटी बळकट करून घेतली. हे पुस्तक नव्याजुन्या पलीकडले होते. त्यांनी मला शिरवाडकरांना विचारायला उत्तेजन दिले. त्यांच्याशी माझा परिचय नव्हता. त्यांच्याकडून पत्रानेच होकार मिळाला.

कालिदासाचे पुस्तक आणि तेही कुसुमाग्रजांचा स्पर्श झालेले, तेव्हा हे पुस्तक फक्त पूर्वमेघ त्रेसष्ट आणि उत्तरमेघ च्योपन्न श्लोकांचे छोटेसे असले तरी ते दिमाखात प्रसिद्ध करावे असा मला मोह झाला. त्या सुमारास एका इंग्रज प्रकाशकाने जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या एका अप्रकाशित नाटकाच्या फक्त अडीचशे प्रती छापल्या होत्या. प्रत्येक प्रतीवर हाती आकडा घातला होता. त्यावेळच्या मानाने या पुस्तकाची किंमत सर्वसाधारणपणे तीन ते पाच ऐवजी अडीचशे रुपये अशी जबरदस्त ठेवली होती. 

पॉप्युलर बुक डेपोने त्याच्या तीन प्रती मागवल्या होत्या आणि उत्साही ग्राहकांनी त्या विकत घेतलेल्या मी पाहिल्या होत्या. अशा पद्धतीने ज्याला ‘कॉफीटेबल बुक’ म्हणतात तशा प्रकारचे पुस्तक प्रसिद्ध करावे, थोड्याच प्रती काढाव्यात, पण किंमत जास्त ठेवून खर्च भरून काढावा असे माझे स्वप्न होते. पण, विष्णुपंतांनी मला भानावर आणले. मराठी वाचक अशा प्रकाशकीय वेडेपणाला आधार देणार नाही याची त्यांना खात्री होती. तेव्हा केशव फडके या नवोदित चित्रकाराने उत्साहाने काढलेल्या रेखाचित्रांनी सजावट करून हे पुस्तक देखणे केले.
कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर यांची भेट झाल्याचे स्मरत नाही. त्यानंतर मात्र मी वसंत कानेटकर यांना भेटायला जात असे तेव्हा न चुकता त्यांच्याकडे डोकावत असे. मला नाटक आणि रंगभूमीविषयी विशेष आस्था असल्याने बहुधा आमच्या भेटीत मी नाटकांबद्दलच बोलत असणार. त्यामुळे कदाचित तात्यासाहेबांनी ‘ओथेल्लो’ या शेक्सपिअरच्या नाटकाचे रूपांतर केले, तेव्हा त्यांनी आपणहून मला एक पोस्टकार्ड टाकून प्रकाशनाविषयी विचारले. तोवर माझा आत्मविश्वास बळावला होता. तेव्हा दिमाखदार कॉफीटेबल आवृत्तीचा मोह टाळून मी ‘ओथेल्लो’ची हार्ड कव्हरमधील डेमी आकाराची प्रत ही ग्रंथालयीन आवृत्ती 
(किंमत : ५ रुपये) आणि रसिक वाचकांसाठी स्वस्त क्राऊन आकारातील आवृत्ती 
(किंमत : २ रुपये) प्रसिद्ध करून हौस भागवून घेतली. नंतरच्या काळात शिरवाडकरांची 
नाटके आणि कवितासंग्रह नियमित पॉप्युलरकडे येऊ लागले त्याची सुरुवात 
अशी झाली.

Web Title: This is how Kalidasa's Meghdoot was born

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.