अशी झाली फजिती... गिरगावऐवजी पोहोचलो गोरेगावला, प्रसाद ओकने सांगितला तो किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 13:06 IST2023-04-16T13:06:19+5:302023-04-16T13:06:30+5:30
Prasad Oak : काम करताना नेहमीच काही ना काही गमती जमती घडत असतात; पण काही घटना अशा असतात, ज्या कधीही विसरता येत नाहीत. अशीच माझी झालेली फजिती आजही चांगलीच आठवतेय.

अशी झाली फजिती... गिरगावऐवजी पोहोचलो गोरेगावला, प्रसाद ओकने सांगितला तो किस्सा
- प्रसाद ओक, अभिनेते, दिग्दर्शक
काम करताना नेहमीच काही ना काही गमती जमती घडत असतात; पण काही घटना अशा असतात, ज्या कधीही विसरता येत नाहीत. अशीच माझी झालेली फजिती आजही चांगलीच आठवतेय. मी मुंबईत अगदी नवखा होतो, त्या काळातली ही गोष्ट. म्हणजे १९९६-९७ मधली असेल. त्यावेळी मला मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशन्स माहीत नव्हते. मी नुकताच मुंबईत आलो होतो. दादरमध्ये मी एके ठिकाणी पेईंग गेस्ट म्हणून राहायचो. त्यावेळी माझ्या एका नाटकाची रंगीत तालीम साहित्य संघ मंदिरामध्ये होती. अशोक मुळ्ये त्या नाटकाचे मॅनेजर होते. ते मला म्हणाले की, उद्या तुला गिरगावला यायचं आहे. तिथे नाटकाची रंगीत तालीम आहे. त्यामुळे तू ट्रेनने ये. मी म्हटलं, बरं...
मी दादर स्टेशनला गेलो आणि सांगितलं की एक गिरगाव तिकीट द्या, असं म्हणालो. गिरगाव नावाचं स्टेशनच नाही, हे मला त्यावेळी माहीत नव्हतं. रेल्वेच्या तिकीट खिडकीवरचा माणूस मला म्हणाला, की गिरगाव नसेल गोरेगाव असेल. मीसुद्धा थोडा गांगरलो आणि म्हणालो, मग गोरेगाव द्या. ते तिकीट घेऊन मी थेट गोरेगावला गेलो आणि तिथे उतरून मी साहित्य संघ मंदिराचा पत्ता विचारत होतो, पण कोणालाच काही माहीत नव्हतं.
बरं त्या काळी पीसीओवरून एक रुपयात कॉल करता यायचा. त्यामुळे मी गोरेगाव रेल्वे स्टेशनवरील पीसीओवरून सुयोग नाट्यसंस्थेच्या ऑफिसमध्ये कॉल केला आणि निर्माते सुधीर भट यांना घडलेला प्रकार सांगितला. ते म्हणाले, अरे बावळटा गोरेगावला नाही. गिरगावला जायचं होतं तुला. गिरगावला जायचं म्हणजे चर्नी रोड स्टेशनला उतरायचं होतं. चर्नी रोड स्टेशनचं तिकीट काढायचं होतं. तू विरुद्ध दिशेला गेला आहेस. त्या काळी मला गिरगाव आणि गोरेगाव यातला फरक सोडा, पण स्टेशन्सची नावंही माहीत नव्हती. मग मी गोरेगाव रेल्वे स्टेशनवरून परत चर्नी रोड स्टेशनचं तिकीट काढलं. कसाबसा चर्नी रोड स्टेशनला पोहोचलो. तिथे उतरून गिरगावमधील साहित्य संघ मंदिरमध्ये गेलो आणि मग नाटकाची तालीम केली.