Mumbai Crime : इमारतीच्या पाइपवरून चार मजले चढून एका घरातून ३६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरल्याचा प्रकार मालाड पोलिसांच्या हद्दीत घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या १२ तासांतच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) मदतीने सराईत आरोपी संतोष चौधरी ऊर्फ वैतू (२३) याला मालाड पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात मुंबई उपनगरांत ३० गुन्हे दाखल आहेत.
मालाड पश्चिमेत हणाऱ्या एका व्यावसायिकाने याप्रकरणी तक्रार दिली. वैतू हा घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये येताना-जाताना दिसत होता. मात्र, त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने अखेर विशिष्ट 'एआय' टूलच्या मदतीने पोलिसांनी त्याची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांच्या चार पथकांनी कामाठीपुरा, जोगेश्वरी, अंबोली, अंधेरी, वांद्रे येथील जवळपास १०० सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली.
एक-दीड किमी पाठलाग
जोगेश्वरीच्या रेल्वे रुळांजवळील एका कच्च्या झोपडीमध्ये त्यांना वैतू दिसला. पोलिसांनी रेल्वे रुळांजवळून एक ते दीड किलोमीटर धावत वैतूचा पाठलाग करून त्याला शिताफीने अटक केली.
३० गुन्हे दाखल
वैतूविरोधात मालाड, खार, जुहू, कांदिवली, बोरीवली, चारकोप, सांताक्रुझ, अंबोली, वर्सोवा, गोरेगाव आणि ओशिवरा पोलिस ठाण्यात एकूण ३० गुन्हे दाखल आहेत, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून ३६ लाख ४० हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.