विशिष्ट लोकांचे ते जोडे चाटताहेत, जनता बघतेय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धवसेनेवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 09:27 IST2025-12-27T09:26:22+5:302025-12-27T09:27:26+5:30
भाजप आणि शिंदेसेनेत युतीतील जागावाटप जवळपास २० महापालिकांमध्ये अंतिम झाले आहे. कोणत्या जागा कोणाच्या वाट्याला गेल्या आहेत याची माहिती स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांना दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाने दिली आहे.

विशिष्ट लोकांचे ते जोडे चाटताहेत, जनता बघतेय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धवसेनेवर टीका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राने केवळ मतांच्या लांगूलचालनासाठी देशविरोधी, धर्मविरोधी, मानवताविरोधी काम करणाऱ्यांना सोबत घेत पक्षात प्रवेश दिला आहे. त्यांना लांगूलचालनासाठी विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत. पण, राष्ट्रप्रेमी जनता हे बघते आहे. याचे नुकसान त्यांना सहन करावे लागेल अशा कठोर शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.
छत्रपती संभाजीनगर येथील राशिद मामू यांना ठाकरेंनी पक्षात प्रवेश दिला आहे. त्यावर फडणवीस म्हणाले की, ठाकरेंचा खरा चेहरा यातून पुढे आला. त्यांना सत्तेच्या लालसेतून प्रवेश देण्यात आला आहे. देशविरोधी, धर्मविरोधी, मानवताविरोधी काम करणाऱ्यांना केवळ मतांच्या लांगूलचालनासाठी सोबत घेतले जर जनता त्यांना उत्तर देईल.
हिंदुंसोबत देश उभा आहे
बांगलादेशी हिंदूंसोबत आम्ही व पूर्ण देश उभा आहे. आता जर आंतरराष्ट्रीय समुदाय या विषयावर गप्प राहिला तर ते लोक किती सिलेक्टिव्ह आहेत हे दिसून येईल. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तेथील हिंदूंना सुरक्षित ठेवण्याचे काम आपले सरकार करेल असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
रस्सीखेच कुठे आहे?
एमएमआर क्षेत्रात, छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये या दोन पक्षांची युती जवळपास झाली आहे. युती कोणत्याही परिस्थितीत करायचीच आहे, हे लक्षात घेऊनच चर्चा करा, असे नेत्यांना बजावून सांगितले टोकाची भूमिका दिसत नाही.
बहुतेक ठिकाणी ठरले; पण काही ठिकाणी अद्यापही तिढा
भाजप आणि शिंदेसेनेत युतीतील जागावाटप जवळपास २० महापालिकांमध्ये अंतिम झाले आहे. कोणत्या जागा कोणाच्या वाट्याला गेल्या आहेत याची माहिती स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांना दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाने दिली आहे.
मुंबई महापालिकेत केवळ २२ ते २५ जागांचा फैसला बाकी आहे. शिंदेसेनेला ८० ते ८२ जागा देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. साधारणत: इतक्याच जागा शिंदेसेनेला दिल्या जातील अशी माहिती आहे. शिंदेसेना ९० पेक्षा कमी जागा घ्यायला तयार नसल्याचे म्हटले जाते. शिंदेसेनेने ८० जागा लढविल्या तर भाजपच्या वाट्याला १४७ जागा जातील. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबईत अद्याप अंतिम जागावाटप होऊ शकलेले नाही.