मुंबईपोलिसांनी धारावी परिसरात मोठी कारवाई करत एका ४१ वर्षीय बांगलादेशी महिलेला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या महिलेला जुलै २०२५ मध्येच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बांगलादेशात डिपोर्ट करण्यात आले होते. मात्र, सर्व सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देत ही महिला पुन्हा एकदा बेकायदेशीरपणे भारतात आणि पर्यायाने मुंबईत दाखल झाली होती. या घटनेमुळे सीमा सुरक्षा आणि घुसखोरीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गस्ती दरम्यान संशय बळावला
धारावी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल मनसब शेख आणि त्यांचे पथक १६ फेब्रुवारीच्या सायंकाळी सायन-बांद्रा लिंक रोडवर गस्त घालत होते. टी-जंक्शन परिसरात एक महिला संशयास्पदरीत्या वावरताना दिसली. पोलिसांनी विचारपूस केली असता तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशय बळावल्याने तिला पोलीस ठाण्यात नेऊन सखोल चौकशी करण्यात आली.
तपासणीत 'ते' सत्य आले समोर
पोलिसी खाक्या दाखवताच महिलेने आपली खरी ओळख सांगितली. रहीमा खातून रोशन अली (वय ४१) असे या महिलेचे नाव असून ती मूळची बांगलादेशातील जेस्सोर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तपासात समोर आले की, २२ जुलै २०२५ रोजी नागपाडा पोलिसांनी तिला बेकायदेशीर वास्तव्याप्रकरणी पकडून बांगलादेशात परत पाठवले होते. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच तिने पुन्हा घुसखोरी केली.
घुसखोरीचा थरारक प्रवास: पश्चिम बंगालमार्गे मुंबईत एन्ट्री
रहीमा खातून हिने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये ती पश्चिम बंगालमधील बेनापोल सीमेवरून एका एजंटच्या मदतीने बेकायदेशीरपणे भारतात शिरली. तिथून हावडा रेल्वे स्थानक गाठून तिने 'हावडा एक्सप्रेस'ने थेट दादर गाठले आणि तिथून ती पुन्हा दक्षिण मुंबईत सक्रिय झाली. बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी तिला एका एजंटने मोठी मदत केल्याचेही निष्पन्न झाले आहे.
मोबाईलमधील 'ते' चॅट ठरले पुरावा
पोलिसांनी रहीमाकडून एक 'आयटेल' कंपनीचा मोबाईल जप्त केला आहे. या फोनची तांत्रिक तपासणी केली असता, त्यात बांगलादेशी राष्ट्रीय ओळखपत्र, पासपोर्टचे फोटो, बांगलादेशातील मालमत्तेची कागदपत्रे आणि अनेक बांगलादेशी संपर्क क्रमांक सापडले आहेत. 'IMO' या मेसेजिंग ॲपवरील चॅटमधून ती बांगलादेशातील लोकांच्या सतत संपर्कात असल्याचे आणि पुन्हा भारतात स्थायिक होण्याचे नियोजन करत असल्याचे उघड झाले आहे. सध्या पोलिसांनी सर्व पुरावे ताब्यात घेतले असून या महिलेला पुन्हा आश्रय देणाऱ्या आणि घुसखोरीला मदत करणाऱ्या एजंटचा शोध सुरू केला आहे.
Web Summary : A Bangladeshi woman, deported in 2025, was rearrested in Mumbai. She illegally re-entered India via West Bengal with an agent's help, raising border security concerns. Police found Bangladeshi IDs and contacts on her phone, revealing plans to resettle in India. An investigation into the aiding agent is underway.
Web Summary : 2025 में निर्वासित एक बांग्लादेशी महिला को मुंबई में फिर से गिरफ्तार किया गया। वह एक एजेंट की मदद से पश्चिम बंगाल के रास्ते अवैध रूप से भारत में फिर से प्रवेश कर गई, जिससे सीमा सुरक्षा को लेकर चिंता बढ़ गई। पुलिस को उसके फोन पर बांग्लादेशी आईडी और संपर्क मिले, जिससे भारत में फिर से बसने की योजना का पता चला। मदद करने वाले एजेंट की जांच चल रही है।