Join us
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : उत्तर मुंबईत घरोघरी होणार तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 01:21 IST

बाधित भागांमध्ये घरोघरी तपासणी मोहिमेत आॅक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी आढळल्यास संबंधित व्यक्तीला घरातच आॅक्सिजन व आवश्यक औषधोपचार देण्यात येणार आहेत.

मुंबई : मुंबईतील अन्य भागांमध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत असताना उत्तर मुंबईत मात्र वेगळे चित्र आहे. मालाड, कांदिवली, बोरीवली आणि दहिसर या भागांमध्ये दैनंदिन रुग्णवाढीचा दर सरासरीहून अधिक आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी काही विभागांमध्ये पोलीस बंदोबस्त आणि गस्त वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर बाधित भागांमध्ये घरोघरी तपासणी मोहिमेत आॅक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी आढळल्यास संबंधित व्यक्तीला घरातच आॅक्सिजन व आवश्यक औषधोपचार देण्यात येणार आहेत.मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी शनिवारी ३४ दिवसांवर पोहोचला. तर दैनंदिन रुग्णवाढ सरासरी २.०५ टक्के आहे. सुरुवातीच्या काळात हॉट स्पॉट असलेल्या वरळी, धारावी, भायखळा, वडाळा, वांद्रे अशा विभागांमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण दोन टक्क्यांहून कमी आहे. मात्र मालाड ते दहिसर या विभागात रुग्णवाढीचा दर सरासरीहून अधिक आहे. दहिसर विभागातील रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ दिसून येत आहे. या परिसरात १६ दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट होत आहे.याची गंभीर दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी संबंधित विभागात प्रत्यक्ष जाऊन आढावा घेतला. या वेळी कोरोना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले. यामध्ये घरोघरी प्रभावी तपासणी, स्थानिक दवाखान्यांच्या माध्यमातून आढळलेल्या रुग्णांशी संपर्क ठेवणे, स्वत:हून रुग्णांना फोन करून लक्ष ठेवणे अशा उपाययोजनांचा समावेश आहे. ‘डोअर टू डोअर’ तपासणीत रुग्णाला आॅक्सिजनची गरज भासल्यास तशी सोय करण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस