बिहार पोलिसांकडे तक्रार देण्याची गरज नव्हती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 06:19 AM2020-08-08T06:19:51+5:302020-08-08T06:20:21+5:30

राज्य सरकारची उच्च न्यायालयात भूमिका; २१ आॅगस्ट रोजी होणार पुढील सुनावणी

There was no need to lodge a complaint with the Bihar police | बिहार पोलिसांकडे तक्रार देण्याची गरज नव्हती

बिहार पोलिसांकडे तक्रार देण्याची गरज नव्हती

Next

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत असताना सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांकडे तक्रार करण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे अधिकार क्षेत्राचे वाद निर्माण होत आहेत, असे मत राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी उच्च न्यायालयात मांडले.

मुंबई पोलीस योग्य प्रकारे तपास करत नसल्याने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा किंवा त्यासाठी एसआयटी नेमावी, अशी मागणी कोलकाता उच्च न्यायालयाच्या वकील प्रियांका तब्रेवाल आणि नागपूरचे रहिवासी समित ठक्कर यांनी केली आहे. शुक्रवारी या याचिकांवर सुनावणी घेताना मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. अजय गडकरी यांनी म्हटले की, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने आम्ही आता सुनावणी घेणार नाही. आमच्या अधिकारांचा वापर करण्याची घाई करणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष
सुशांत आत्महत्येप्रकरणी बिहार पोलिसांकडे रियाविरुद्ध तक्रार करण्यात आल्यानंतर तिने हा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आता १८ आॅगस्ट रोजी सुनावणी आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने याचिकांवरील सुनावणी २१ आॅगस्ट रोजी ठेवली आहे.

सीबीआय करणार आत्महत्येचे रिक्रिएशन
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुशांतसिंहच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा नोंद करत तपासाची रूपरेषा आखली आहे. या पथकाचे नेतृत्व आयपीएस मनोज शशिधर करणार आहेत. सीबीआयचे पथक मुंबईत आल्यानंतर सुशांतच्या फ्लॅटमध्ये आत्महत्येचे रिक्रिएशन करणार आहे. यासाठी दिल्लीहून फॉरेन्सिकचे पथकही त्यांच्यासोबत असणार आहे. सीबीआयने रिया चक्रवर्तीसह तिचे वडील इंद्रजीत, आई संध्या, भाऊ शोविकसह मॅनेजर श्रुती मोदी आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. रिक्रिएशनद्वारे घटनेच्या आधी आणि नंतर इतर मंडळी काय करत होते? त्यांनी दिलेली माहितीसह घटनाक्रमाचा आढावा सीबीआय घेईल, अशी माहित सूत्रांनी दिली.

रियाने वर्षभरात सुशांतला केले १३७ कॉल
रिया चक्रवर्तीच्या कॉल रेकॉर्डनुसार रियाने सुशांतला वर्षभरात १३७ कॉल केले. तर महेश भट्ट यांना १६, सुशांतचे वडील ११२२, स्वत:चा भाऊ शोविकला ८८६, तर श्रुती मोदीला ८०८ वेळा कॉल केले. यात सँडी नावाच्या व्यक्तीलाही ५३७ वेळा कॉल केले आहेत. मुंबईत सुशांत प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्याशी तिचा २१ जून ते १८ जुलैदरम्यान पाच वेळा संवाद झाला. यात चार कॉल आणि एका संदेशाचा समावेश आहे. 

परमबीर सिंग भाजपच्या निशाण्यावर
सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या आत्महत्याप्रकरणी पोलीस तपास अधिकारी आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भूमिका हलगर्जीपणाची आहे. त्यामुळे तपास योग्य टप्प्यावर येईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी भाजप नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
 

Web Title: There was no need to lodge a complaint with the Bihar police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.