मुंबईत टोलमाफी नाहीच, एकनाथ शिंदे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 05:16 IST2020-03-05T05:16:14+5:302020-03-05T05:16:22+5:30
टोलनाके बंद केल्यास एकरकमी १३ हजार ३७९ कोटी किंवा पाच टप्प्यांत १८ हजार ३४४ कोटींची नुकसानभरपाई कंपनीला द्यावी लागेल, असे या समितीच्या अहवालात नमूद आहे.

मुंबईत टोलमाफी नाहीच, एकनाथ शिंदे यांची माहिती
मुंबई : मुंबई प्रवेशद्वारासह मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसुली बंद करता येणार नाही, असे लेखी उत्तर सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधान परिषदेत दिले. काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
मुंबई प्रवेशद्वार आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हलक्या वाहनांना सूट देण्याबाबत आर्थिक सुसाध्यता तपासण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या अहवालानुसार टोलमाफी शक्य नसल्याचा निर्वाळा शिंदे यांनी लेखी उत्तरात दिला. मुंबईच्या प्रवेशद्वारावर तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पथकर नाक्यावरील हलकी वाहने, एसटी बसेसना सवलत दिल्यास एकरकमी सुमारे ६ हजार ८५३ कोटी, पाच टप्प्यांत दिल्यास ९ हजार ४६३ कोटी नुकसानभरपाई द्यावी लागेल. हे टोलनाके बंद केल्यास एकरकमी १३ हजार ३७९ कोटी किंवा पाच टप्प्यांत १८ हजार ३४४ कोटींची नुकसानभरपाई कंपनीला द्यावी लागेल, असे या समितीच्या अहवालात नमूद आहे. ही नुकसानभरपाई मोठी असल्याने या पथकर नाक्यांवरची टोल वसुली बंद करणे शक्य नसल्याचे शिंदे म्हणाले.