कोस्टल रोडवर बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिकाच नाही; पहिला टप्पा ९ फेब्रुवारीला वाहतुकीसाठी खुला 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 10:12 AM2024-01-11T10:12:46+5:302024-01-11T10:13:44+5:30

कोस्टल रोडवर बेस्ट बससाठी स्वतंत्र मार्गिका असेल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा  होती.

There is no separate route for BEST on the coastal road in mumbai | कोस्टल रोडवर बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिकाच नाही; पहिला टप्पा ९ फेब्रुवारीला वाहतुकीसाठी खुला 

कोस्टल रोडवर बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिकाच नाही; पहिला टप्पा ९ फेब्रुवारीला वाहतुकीसाठी खुला 

मुंबई : कोस्टल रोडवर बेस्ट बससाठी स्वतंत्र  मार्गिका असेल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा  होती. मात्र, अशा प्रकारे कोणतीही स्वतंत्र मार्गिका नसेल; परंतु  कोस्टल रोडवरून सर्व प्रकारच्या परिवहन सेवांना प्रवास करता येणार आहे.  कोस्टल रोडचा दक्षिण दिशेकडील वरळी ते मरिन ड्राइव्ह हा पहिला टप्पा ९ फेब्रुवारी रोजी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. पहिला टप्पा सुरू होणार असला, तरी या टप्प्यात वीकेंडला पहिल्या टप्प्यावरील वाहतूक बंद ठेवण्याची शक्यता आहे. 

कोस्टल रोडवर बससाठी स्वतंत्र मार्गिका असेल, अशी अपेक्षा होती; परंतु ती ठेवण्यात आलेली नाही.  या मार्गात प्रत्येकी चार या प्रमाणे एकूण आठ मार्गिका असतील. बससाठी स्वतंत्र मार्गिका ठेवल्यास दोन मार्गिका कमी होतील. मुळात बस या ठरावीक वेळेच्या अंतराने धावतात. हे गणित  पाहता मधल्या वेळेत  ती मार्गिका मोकळीच राहील. दोन मार्गिका कमी झाल्याने उर्वरित मार्गिकांवर वाहतुकीचा भार  वाढू शकतो. त्यामुळेच स्वतंत्र मार्गिकेचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

स्वतंत्र मार्गिकेची आवश्यकता का नाही ? 

मुळात कोस्टल रोड हा आठ मार्गिकांचा आहे. या मार्गात सिग्नल नाही. त्यामुळे वाहतुकीत खंड पडण्याची शक्यता नाही. ज्या ठिकाणी जे काही आंतरबदल  आहेत, तेथेही वाहतूक थांबण्याची शक्यता नाही. एकूणच सर्व वाहनांचा प्रवास जलद होणार आहे. बेस्ट बस कोणत्याही मार्गिकेमधून धावली तरी बसचा प्रवासही इतर वाहनांप्रमाणेच सुसाट होईल. ही  बाब लक्षात घेता स्वतंत्र  मार्गिका ठेवण्यात आलेली नाही. 

पहिल्या टप्प्याचा प्रवास :

३१ जानेवारी पहिला टप्पा कंत्राटदाराकडून पालिकेला हस्तांतरित होईल. त्यानंतर काही दिवस या मार्गाच्या चाचण्या घेण्यात येतील.  एकूणच सुरक्षा, वाहनांचा प्रवास या बाबी लक्षात घेतल्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी पहिला टप्पा खऱ्या अर्थाने वाहतुकीसाठी खुला होईल.  या टप्प्यात सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेतच प्रवास करता येईल. 

कोस्टल रोड भक्कम आणि दीर्घायुषी :

संपूर्ण कोस्टल  रोड सिमेंट काँक्रीटचा असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे  पुढील ३० वर्षांपर्यंत तरी डागडुजीची मोठी कामे निघणार  नाहीत, अशी अपेक्षा  आहे.  त्यामुळे देखभाल खर्चात मोठी बचत होईल.

Web Title: There is no separate route for BEST on the coastal road in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई