मुंबई - शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्याचा नियम असतानादेखील मुंबईतील एका वाहतूक पोलिस हवालदाराने एका महिला प्रवाशाला असा कोणताही नियम नसल्याचे सांगत तिच्याशी हुज्जत घातल्याची घटना बुधवारी घडली.
गोरेगाव येथे राहणाऱ्या अनुप्रिया देसाई या बुधवारी दुपारी काही कामानिमित्त आपल्या वाहनाने बाहेर गेल्या होत्या. त्याचदरम्यान वाहतूक पोलिसांच्या गाडीने त्यांचे वाहन ओढून नेले. त्यावेळी त्या गाडीजवळ पोहोचल्या असता पी. एन. साबळे (बक्कल क्र : ०६०२६५) हे हवालदार तिथे होते. त्यांच्याकडील स्पीकरमधून हिंदीमध्ये उद्घोषणा करत असल्याचे त्यांना जाणवले. ‘तुम्ही मराठी घोषणा का करत नाहीत’, अशी विचारणा अनुप्रिया देसाई यांनी त्याला सातत्याने केली. त्यावेळी मराठीत बोलण्याचा कोणताही नियम नसल्याचे साबळे यांनी सांगितले आणि त्यानंतर त्यांच्याकडील स्पीकरमध्ये तांत्रिक बदल केल्याचे देसाई यांनी सांगितले. देसाई यांनी या संपूर्ण घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण केले आहे.