मुंबईत अतिसंवेदनशील मतदान केंद्र एकही नाही; केंद्रनिहाय याद्यांसाठी ३ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 06:37 IST2025-12-27T06:36:52+5:302025-12-27T06:37:07+5:30
राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्याबाबत शुक्रवारी सुधारित कार्यक्रम जाहीर केला.

मुंबईत अतिसंवेदनशील मतदान केंद्र एकही नाही; केंद्रनिहाय याद्यांसाठी ३ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पालिका निवडणुकांसाठी जवळपास १०,३०० केंद्र उपलब्ध केली जाणार असून, सद्य:स्थितीत मुंबईत एक ही अतिसंवेदनशील केंद्र नसल्याची माहिती मुंबई पालिकेने दिली आहे. मुंबईतील मतदान केंद्रनिहाय मतदारांची यादी प्रारूप यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असून, अंतिम यादी दि. ३ जानेवारीपर्यंत जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्याबाबत शुक्रवारी सुधारित कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार दुबार मतदार व मतदान केंद्रनिहाय मतदार यादीचे कंट्रोल चार्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी २७ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी दि. ३ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिकानिहाय संपूर्ण मतदार यादी जसजशी पूर्ण होईल तसतशी प्रसिद्ध करावी, असेही आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे पालिकेकडून आता मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यासाठी आणखी काहीकाळ वाट बघावी लागणार आहे. या यादीवरून दहापेक्षा मतदान केंद्र कोणत्या ठिकाणी आहेत? तेथील मतदारसंख्या किती आहे? यावरून किती मतदान ठिकाणे संवेदनशील आहेत याची निश्चिती करण्यात येईल, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मतदान केंद्राच्या ठिकाणी सुविधा
पालिका कार्यक्षेत्रात विधानसभेसाठी सुमारे १०,१११ मतदान केंद्र उपलब्ध करण्यात आली होती. केंद्रांची संख्या कमी जास्त होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मतदान केंद्रांवर वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, रॅम्प या सुविधांसाठी पालिकेकडून प्रक्रिया ही सुरू करण्यात अली आहे. प्रत्येक विभागाची जबाबदारी दिलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर या मतदान केंद्राची पाहणी, पडताळणी करायची सूचना देण्यात आल्या आहेत.