मध्य रेल्वेच्या ९५ स्थानकांवर वैद्यकीय कक्षच उपलब्ध नाही; मदत मिळणार कशी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 10:07 IST2025-10-27T10:07:48+5:302025-10-27T10:07:48+5:30
पश्चिम रेल्वेवरच्या १९ स्टेशनांवरही गंभीर परिस्थिती

मध्य रेल्वेच्या ९५ स्थानकांवर वैद्यकीय कक्षच उपलब्ध नाही; मदत मिळणार कशी?
मुंबई :मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील तब्बल ९५ रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्षच उपलब्ध असल्याची धक्कादायक बाब लोकमतला मिळालेल्या माहितीमधून उघड आली आहे. गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून, तसेच विविध घटनांमध्ये रोज मोठ्या संख्येने प्रवासी जखमी होत असताना इतक्या मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय सुविधाच नसल्याने यातून रेल्वेप्रशासनाचा प्रवाशांच्या सुरक्षेबद्दलचा हलगर्जीपणाच अधोरेखित झाल्याची टीका प्रवाशांमधून होत आहे.
पश्चिम रेल्वेच्या १९ रेल्वे स्थानकांवर अद्याप वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. उपनगरी लोकलमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपत्कालीन, तसेच इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी रेल्वेची असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. असे असतानाही मध्य रेल्वेच्या ९५ टक्के स्टेशनवर, तर पश्चिम रेल्वेच्या ५४ टक्के स्टेशनवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उपलब्ध नाहीत. जून महिन्यात मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्टेशनदरम्यान मोठा अपघात झाला होता. यावेळी सुमारे १३ प्रवासी जखमी, तर त्यापैकी काही मृत्युमुखी पडले होते. अशाप्रसंगी प्रथमोपचार, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा तसेच रुग्णवाहिका वेळेत मिळणे अपेक्षित असते. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकांमध्ये अशा सुविधाच नसल्याने रेल्वे प्रशासनाला नक्की प्रवाशांच्या जिवाची काळजी आहे का? असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, स्टेशनवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेच्या वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले, तर मध्य रेल्वेच्या २१ स्टेशनवर आपत्कालीन मेडिकल बॉक्स उपलब्ध असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला.
निविदेला दाद मिळेना
पश्चिम रेल्वेच्या रेल्वेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यासाठी ३०० चौरस फूट जागेची आवश्यकता असते. तसेच, अनेकदा निविदा प्रक्रिया राबवूनही कोणीही स्वारस्य दाखवत नाही. नालासोपारा स्टेशनवर पाचपेक्षा जास्त वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही कोणी आले नाही. त्यामुळे याठिकाणी सध्या सुविधा उपलब्ध नाही.
सध्या २१ स्टेशनवर आपत्कालीन मेडिकल बॉक्स आणि डिफिब्रिलेटर उपलब्ध आहेत. इतर स्टेशनवर देखील लवकरच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
पश्चिम रेल्वेने विविध रेल्वे स्थानकांवर अनेक वैद्यकीय आणि रिमोट मेडिकल असिस्टन्स सुविधा दिल्या आहेत. प्रवाशांना तत्काळ मदत देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत- विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे