औषध निरीक्षकच नाहीत; कफ सिरप उत्पादन तपासणी काेण करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 09:30 IST2025-10-10T09:30:14+5:302025-10-10T09:30:45+5:30
राज्यात औषध निरीक्षकांची २०० पदे मंजूर आहेत. ती फार पूर्वी मंजूर करण्यात आली होती.

औषध निरीक्षकच नाहीत; कफ सिरप उत्पादन तपासणी काेण करणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कफ सिरप उत्पादन प्रक्रियेची तपासणी करण्याची मोहीम राज्याच्या अन्न औषध प्रशासन विभागाने उघडली आहे. मात्र, यासाठी विभागाकडे पुरेसा अधिकारी वर्ग नसल्याचे समोर आले आहे. राज्यात २०० औषध निरीक्षकांची पदे मंजूर असताना सध्या केवळ ४५ अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे विभागाच्या कामकाजावर परिणाम होत आहे.
अन्न औषध प्रशासन विभागाच्या काही अधिकाऱ्यांना बढती मिळाल्यानंतर ते वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. तर, काही अधिकारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे मोजक्याच अधिकाऱ्यांवर विभागाच्या कामकाजाचा डोलारा आहे. या पार्श्वभूमीवर विभागाने लहान मुलांच्या कफ सिरपची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देऊ नये, असे निर्देश दिले आहेत.
सहा महिन्यांत नवे अधिकारी
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कमी अधिकारी कार्यरत असल्याची वस्तुस्थिती असल्याचे मान्य केले. मात्र, नवीन भरती करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात देऊन प्रक्रिया सुरू केली आहे. या माध्यमातून पुढील सहा महिन्यांत १०९ अधिकारी एफडीएमध्ये रुजू होतील, असे ते म्हणाले.
८८ विक्रेत्यांना मनाई आदेश
अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभर विना प्रिस्क्रिप्शन कफ सिरप विकणाऱ्या आणि विना प्रिस्क्रिप्शन वर्गीकृत औषधांची विक्री करणाऱ्यांची तपासणी सुरू केली आहे. त्यात ८८ विक्रेत्यांना औषध विक्री त्वरीत बंद करण्याचे आदेश देण्यात आले. १०७ विक्रेत्यांना परवाने निलंबित किंवा रद्द का करू नये म्हणून कारणे दाखवा नोटीस बजाविण्याची शिफारस करण्यात आली आहे.